आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Solapur Municipal Corporation Border Extension, Divya Marathi

प्रारूप आराखड्यातून साधला जाणार हद्दवाढ भागाचा विकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 मे 1992 रोजी सोलापूरची हद्दवाढ होऊन 16 गावे शहर हद्दीत समाविष्ट झाली. या घटनेला 22 वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु मूलभूत सुविधांबाबत या भागाचा विकास ‘जैसे थे’ राहिला आहे. यापुढे मात्र विकास आराखड्याच्या माध्यमातून या भागाचा विकास करू, असा विश्वास महापालिकेच्या महापौर अलका राठोड आणि आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केला आहे.
वेळप्रसंगी कर्ज काढू, पण मूलभूत सुविधा पुरवू
हद्दवाढ भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या भागातील नागरिकांचा वनवास संपविण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढू, पण सुविधा पुरवू असे महापौर अलका राठोड यांनी सांगितले.
महापौर राठोड म्हणाल्या, ‘हद्दवाढचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्या संदर्भातला विषय नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. आराखड्यामध्ये जर काही सूचना असतील तर त्या स्वीकारल्याही जातील. यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजुरीकरिता येईल. यावेळी या विषयावर चर्चा होईल आणि योग्य सूचना स्वीकारल्या जातील. चुकूनही कुठला विकास शिल्लक राहता कामा नये त्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाणार आहे. सोलापुरातील लोकसंख्येच्या तुलनेत पन्नास टक्के लोकसंख्या हद्दवाढ भागात आहे. त्यामुळे तेथे प्राधान्याने मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. ड्रेनेज, पाणी, वीज, उद्यान, दवाखाना, शाळा आदी सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. या सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने काही ठिकाणी मिनी आणि मेजर गाळे बांधण्यात येतील. इतर विकास कामासाठीही प्रयत्न राहील.’