आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण डोंगरे झेडपीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांना नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. डोंगरे अमरावती महापालिकेचे आयुक्त होते. दोन महिन्यांपूर्वी चंद्रकांत गुडेवार यांची अमरावती महापालिका आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर डोंगरे यांना नियुक्ती मिळाली नव्हती. ती आता मिळाली.

श्री. काकाणी यांची आठ महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. शांत स्वभाव, पण प्रशासकीय कामांमध्ये तत्परता सर्वसामान्यांना सामावून घेण्याच्या कौशल्यामुळे काकाणी अल्पावधीत लोकप्रिय अधिकारी ठरले. त्यांनी आठ महिन्यांत जिल्हा परिषदेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. सोमवारी (दि. ११) पुणे येथे झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या राज्यस्तरीय बैठकीत ग्रामविकास विभागाचे सचिव व्ही. गिरीराज यांनी काकाणी यांनी सोलापुरात राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, सोलापुरात राबवलेल्या योजना उपक्रम राज्यात लागू करण्याचे आदेश दिले.

अधिकारी-कर्मचार्‍यांचा व्हॉटअसप ग्रुप, पर्यावरण जागृतीसाठी नो व्हेइकल डे, पेपरलेस झेडपीसाठी पुढाकार, कर्मचार्‍यांचे वाढदिवस साजरे करून त्यांचे मनोबल वाढवणे, ऑनलाइन तक्रार नोंदीसाठी एलएमएस सुविधा, पारदर्शक कर्मचारी भरती प्रक्रिया, भरती परीक्षेच्या प्रश्न उत्तरपत्रिका वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे लोकाभिमुख निर्णय घेतले. तसेच, विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना शेतीमधील विविध प्रयोग करण्याबरोबर, त्यांच्यातील नैराश्य दूर करण्यासाठी अभ्यासदौरा त्यांनी नुकताच आयोजिला होता. काकाणी शुक्रवारी सोलापूरचा पदभार सोडणार असून शनिवारी (दि.१६) नांदेडच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे घेणार आहेत.

अल्पकालावधीत सोलापूरमध्ये अनेक लोकाभिमुख कामं करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. येथील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सदस्यांबरोबर, सर्वसामान्य नागरिक कर्मचार्‍यांनी उर्स्फूत सहकार्य केले. सोलापूरकरांनी दिलेले प्रेम सहकार्य कायम स्मरणात राहील. -सुरेश काकाणी.

सोमवारी पदभार घेणार
जिल्हापरिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांना महसूल विभागातील कामाचा मोठा अनुभव आहे. अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी काही दिवस जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळला आहे. तसेच, अमरावती महसूल विभागाचे उपसचिव होते. त्यानंतर महापालिकेचे आयुक्तपद त्यांनी सांभाळले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सोलापुरात पदभार घेण्यासाठी येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...