आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी यात्रेसाठी बनवणार प्रसादाचे 12 लाख लाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी येणा-या भाविकांना प्रसादासाठी सुमारे 10 ते 12 लाख बुंदीचे लाडू प्रसाद बनवण्याचे नियोजन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केले आहे. सध्या एक ते दीड लाख लाडू तयार झाल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.

आषाढी यात्रेसाठी राज्यासह शेजारच्या कर्नाटक व आंध्रप्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतात. मंदिर समिती पाच रुपयास एक लाडू इतक्या अत्यल्प किमतीत लाडू देते. पूर्वी प्रत्येक भाविकाला दोनच लाडू विकले जात. गेल्या तीन वर्षांपासून भाविकांना हवे तेवढे लाडू विकत देण्यास सुरुवात केली आहे. यंदा समितीचे सुमारे 250 ते 300 क्विंटल लाडू बनवण्याचे उद्दिष्ट आहे. 28 जूनपासून मंदिर समितीचे 40 कर्मचारी आणि लाडू निर्मिती ठेकेदाराचे 30 कर्मचारी रात्रंदिवस भक्तनिवासात लाडू बनवत आहेत. समितीने यावर देखरेखीसाठी 10 ते 12 कर्मचारी नेमल्याचेही तेली यांनी सांगितले.

लाडू बनवण्याचे नियोजन
गेल्या तीन-चार वर्षांतील यात्राकाळात झालेल्या लाडू विक्रीच्या आकडेवारीवरून लाडू बनवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार यात्राकाळात दररोज 50 ते 60 हजार तर मुख्य एकादशी आणि द्वादशी दिवशी एक ते दीड लाख लाडूंची विक्री होईल, असा अंदाज आहे. त्याप्रमाणे रोज लाडू बनवले जात आहेत.

तेल, साखर, डाळीची खरेदी
मंदिर समितीने लाडू बनवण्यासाठी दोन हजार तेलाचे डबे, 350 क्विंटल साखर व 350 क्विंटल हरभरा डाळीची खरेदी केली आहे. बुंदीच्या लाडूची कळी तयार करण्यासाठी गॅस सिलिंडर व रॉकेलची व्यवस्था केली आहे.

प्रसाद विक्री केंद्र
शहरातील श्री विठ्ठल मंदिर उत्तरद्वार, पश्चिमद्वार, मंदिराशेजारील श्री ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे लाडू विक्री केंद्र सुरू केले आहेत.

फोटो - पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना विक्री करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने भक्त निवासात बुंदी्र्रचे लाडू तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी समितीच्या कर्मचा-यांसह ठेकेदाराचे कामगार काम करत आहेत. छाया. राजू बाबर