आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापुरातील जळीत प्रकरण : जखमी पवार यांचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - वेळापूर येथील जळीत घटनेतील जखमी अशोक पवार यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पवार यांच्या अंत्यविधीवेळी वेळापूरला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकरणी वेळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवशंकर बोंदर यांचीही चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांनी दिले आहेत. दरम्यान बुधवारी (दि. 4) डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून, या वेळी कोणता निर्णय होतो, याकडे लक्ष लागून आहे.

वेळापूर येथे 16 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्यामध्ये विठ्ठल पवार, पारूबाई पवार व त्यांचा मुलगा अशोक पवार हे गंभीररीत्या भाजले होते. या तिघांवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अशोक पवार यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकरणात वेळापूरचे साहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी पक्षपात केला आहे. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी पवार कुटुंबीयांनी लावून धरली. परिस्थितीचे गांभीर्य पाहता शिवशंकर बोंदर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, असे लेखी आदेश जिल्हा पोलिस प्रमुख राजेश प्रधान यांनी अकलूजचे पोलिस उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांना दिले व त्याची प्रत नातेवाइकांना दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

ज्या शेताच्या वादातून ही घटना घडली, त्या शेतात अशोक पवार यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला. मृत अशोक पवार यांचे वडील पवार व आई पारूबाई पवार हे ही पुणे येथे उपचार घेत आहेत. मुलाच्या मृत्यूचा बातमीचा मानसिक धक्का पोहोचू नये म्हणून त्यांना या संदर्भात अद्याप काहीही कळवण्यात आले नाही. या घटनेप्रकरणी एकूण 11 व्यक्तींवर नावानिशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 जणांना अटक करण्यात आली असून, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील जामिनावर आहेत तर ज्योती कुंभार ही महिला फरार आहे.

साहाय्यक पोलिस निरीक्षक बोंदर चौकशीच्या फेर्‍यात
वेळापूरचे साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी या घटने संदर्भात पक्षपातीपणा केला आहे का? त्यांनी कर्तव्य बजावण्यात काही कसूर ठेवली आहे का? त्यांनी तसे केले असेल तर ते योग्य नाही. त्यांची या संदर्भात खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. पवार कुटुंबीयांनी यापूर्वी 1 नोव्हेंबर 2012 रोजी तक्रार अर्ज केला होता. त्यावर वेळापूर पोलिस ठाण्याने कोणती भूमिका घेतली, याचाही या चौकशीत उल्लेख करावा व चौकशी अहवाल आपल्याकडे पाठवावा, असे आदेश एका लेखी पत्नाद्वारे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. राजेश प्रधान यांनी तपास अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे साहायक पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांचीही या संदर्भात चौकशी होणार आहे.

डॉ. धवलसिंहांच्या जामिनावर आज सुनावणी
या घटनेसंदर्भात जिल्हा परिषद सदस्य डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सध्या अंतरिम जामिनावर आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. 4) सुनावणी होणार आहे. त्यावेळी डॉ. धवलसिंह यांनी न्यायालयात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने पारित केलेले आहेत. त्यांच्या जामिनाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

302.दाखल होऊ शकतो
या प्रकरणाची व्हिडिओ क्लिप आरोपी पक्षाच्या वतीने न्यायालयास दिली आहे. त्याची एक प्रत वैधता पडताळणीसाठी मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहे. मंगळवारी मृत्यू झालेले अशोक पवार यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. डॉ. संजयकुमार पाटील, पोलिस उपाधीक्षक