आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची शेगाव येथील (ता. अक्कलकोट) भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भीमाशंकर कोरे यांच्या खून प्रकरणातून झालेली निदरेष मुक्तता, हाच आता पर्यायाने आगामी अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी मुद्दा ठरणार आहे.
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजपचे प्रतिस्पर्धी सिद्रामप्पा पाटील यांनी केवळ याच खुनातील आरोपांच्या प्रचार मुद्दय़ांवर निवडणुकीची रणधुमाळी गाजवून निवडणूक जिंकली. ऐन निवडणूक प्रचार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हेत्रे बंधूंवर गुन्हे दाखल झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रचार यंत्रणेत उतरण्यात त्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. म्हणून त्यावेळी माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रेंच्या अर्धांगिनी सुवर्णा म्हेत्रे यांनाही प्रचारात उतरावे लागले होते.
म्हेत्रे बंधूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना काँग्रेसच्या दुबळ्या प्रचार यंत्रणेपुढे भाजपच्या प्रचारात सिद्रामप्पा पाटील गटाला मोठे बळ आले होते. म्हेत्रे बंधूंना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण, तोवर प्रचारासाठी निवडणूक आयोगाने निर्धारित केलेला बराच कालावधी निघून गेला होता. शेवटी प्रचार कालावधी संपण्याच्या केवळ दोन दिवस आधी म्हेत्रे यांना अटकपूर्व जामीन मिळाला. त्या दोन दिवसाच्या निवडणूक प्रचारामुळे म्हेत्रेंना केवळ सुमारे बाराशे मतांच्या फरकाने भाजपच्या पाटील यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भीमाशंकर कोरे यांचा मतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर सिद्रामप्पा पाटील कोरे यांच्या नातेवाइकांसमोर ज्या पद्धतीने धाय मोकलून रडत होते त्यावेळचे हृदयद्रावक वातावरण पाहून उपस्थित लोकांनाही शोक अनावर झाला होता. सोमवारच्या निकालानंतर पाटील यांनी कोरे कुटुंबाला न्याय मिळू शकला नाही अशी, तर म्हेत्रे यांनी आम्हास अकारण गोवण्यात आले होते अशी अपेक्षित प्रतिक्रिया नोंदविली. यावरून साध्या वाटणार्या या प्रतिक्रियांचे प्रतिबिंब हे अक्कलकोटच्या आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच ठळकपणे प्रचाराच्या अंगानी उमटतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.