आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

मुलीसाठी सुवर्ण‘मध्य’ साधण्याचा सुशीलकुमार शिंदे यांचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेले पाच दिवस सोलापुरात ठाण मांडून बसलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मंगळवारी मुंबईला पोचले. त्यानंतर तब्बल तीन तास सोलापूरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यंत्रमाग कारखानदार, कामगार यांच्यासह पद्मशाली, वडार, मोची, कैकाडी या समाज घटकांचे प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासमोर मांडले. या सर्व घटकांना खुश करण्यासाठी या मॅरेथॉन बैठका झाल्या.
विधानसभा निवडणूक आता जवळ आली. कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचा शहर ‘मध्य’ मतदारसंघ सुकर करण्यासाठी त्यांनी विविध समाजघटकांचा धांडोळा घेतला. त्यांच्यातील नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे प्रश्न हाती घेतले आणि स्वत: मुंबईला पोचले. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकांवर बैठका झाल्या. रमजानची सुटी असूनही सचिव, संबंधित खात्याचे अधिकारी झाडून उपस्थित होते. सोलापुरातील सुमारे दीडशे लोक सह्याद्री अतिथीगृहात फिरत होते.

शिंदे यांनीच घातले लक्ष
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारण्याची मोहीमच र्शी. शिंदे यांनी उघडली. आता मोकळीक मिळाल्याने गेले पाच दिवस सोलापुरात ठाण मांडून होते. विविध भागातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यात प्रामुख्याने ‘शहर मध्य’ मतदार संघातील कार्यकर्ते होते. 5 दिवस ढवळून काढल्यानंतर मंगळवारी मुंबईत त्यांचे प्रश्न धसास लावण्याचे प्रयत्न केले.
महेश कोठेंशी संवाद
बंडाचे निशाण फडकावणारे महेश कोठे यांच्याशीही त्यांनी सोलापुरात संवाद साधला. एका इफ्तार पार्टीत दोघेही बसून बोलत होते. त्यानंतर तात्यांशीही हितगूज केली. महेश कोठे यांनी कुठलीच हालचाल करू नये, याची दक्षता घेण्याची यंत्रणाही त्यांनी उभी केल्याचे सांगण्यात येते.
हे होते प्रश्न
1. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कायम करणे
2. कैकाडी समाज घटकाला ‘अनुसूचित जाती’मध्ये समाविष्ट करणे
3. दगड खाणींची रॉयल्टी माफ करण्यासाठी वडार समाजाचा प्रश्न होता
4. ‘यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्याची मागणी
ही झाली कार्यवाही
1. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यापासून विसजिर्त सोलापूर नागरी औद्योगिक बँकेतील कर्जदारांना व्याजमाफ
2. एनसीडीसीकडून कर्जे घेतलेल्या यंत्रमाग सहकारी संस्थांना ‘ओटीएस’ची योजना देण्याचे आदेश
3. कैकाडी समाजाला राज्यभर एकाच जातीत समाविष्ट करण्यासाठी समाजकल्याण खात्याला दिले निर्देश
4. हातमाग विणकर संस्थांना अडीच कोटी रुपयांची कर्जमाफी अजून देय आहे. त्याची रक्कम देण्याची सूचना