आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीपुरताच पाणीप्रश्न येतो चर्चेत, नंतर पडतो विसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला- सांगोला तालुक्यातील आजवरच्या सर्वच निवडणुका शेती, पाणी प्रश्नावर लढवल्या गेल्या. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या धरणातून तालुक्याला पाणी मिळेल, अशी आश्वासने दिली. त्यामध्ये देवधर, नीरा, उजनी, वीर, टेंभू, म्हैसाळ तसेच पुणे, सांगली जिल्ह्यातील धरणांची नावे सांगून पाणी मिळेलच, असा विश्वास निवडणुकांदरम्यान देण्यात आला. मात्र, निवडणुका झाल्या की, सत्ताधारी व विरोधकांनाही पाणी प्रश्नाचा विसर पडल्याचे आजवर दिसून आले.
सन 2011 ते 2013 या दुष्काळातील दोन वर्षांत टेंभू व म्हैसाळचे पाणी येईल म्हणून आमदार गणपतराव देशमुख व आमदार दीपक साळुंखे यांनी फक्त तारखांवर तारखाच दिल्या. पण प्रत्यक्षात पाणी काही आलेच नाही. टेंभूचे पाणी नैसर्गिक मार्गाने बुद्धेहाळ तलावात सोडण्यास आले. परंतु, ते पाणी आटपाडी तालुक्यात फोडण्यात आल्याने तेही बंद झाले. ते पुन्हा कधी येईल याबद्दल कोणीही ठोस सांगितले नाही. म्हैसाळचे पाणी यावर्षी आलेच नाही.
तालुक्यात नीरा उजवा कालवा शाखा तीनच्या पाण्याचे गेल्या दोन वर्षांत अस्तरीकरण १०० टक्के पूर्ण केले. तर उन्हाळा व खरीप हंगामात दोन पाळ्या वाढवून देणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले होते. ते पाळले गेले नाही. नीरा उजवा कालवा शाखा चारला गेल्या १३ वर्षांत फक्त दोन वेळा पाणी आले. त्यातील एक चाचणीसाठी व एक गतवर्षी दुष्काळात. पण ज्या मुख्य उद्देशाने हा फाटा तयार केला त्यावरील माण नदीतील १६ बंधारे तीव्र दुष्काळ असताना कधीही भरले नाहीत.

युतीने दिली सिंचनाला गती
1995 मध्ये युती शासनाने सांगोला तालुका दुष्काळी असल्याने टेंभू योजना 80 टक्के पूर्ण केली. तालुक्यात शिरभावी व 81 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देऊन तेही 80 टक्के पूर्ण केले. सांगोला सिंचन योजना मंजूर केली, नीरा उजवा कालवा शाखा चारच्या 1972 पासून रखडलेल्या कामाला गती दिली. हे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. म्हैसाळ योजनेची घोषणा करून त्यामध्ये तालुक्यातील उर्वरित गावांचा शेतीपाण्यासाठी समावेश केला.
देशमुख यांनाही विरोध
स्व. काका साळुंके आणि शहाजी पाटील यांचा अपवाद वगळता 50 वर्षे आमदार म्हणून गणपतराव देशमुख हे निवडून येत आहेत. पण, यंदा त्यांना विरोध वाढत आहे. शेकापचे कार्यकर्ते आता देशमुख यांनी 50 वर्षांत काहीच केले नसल्याचे ते म्हणत आहेत. तालुका आवर्षणग्रस्त व दुष्काळी असल्याने टँकर लॉबी, घोटाळेबाजांचा सुकाळ आहे. त्यामध्ये चारा घोटाळा, अनुदान घोटाळा, विहीर घोटाळा, शेण, औषधे घोटाळा यांची मालिका आहे.