आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या उमेदवाराकडून 35 लाख रुपये घेतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांकडून 35 लाख रुपये घेतल्याच्या सनसनाटी आरोपासह त्यांच्या दहा वर्षांतील कामाच्या चौकशीची मागणी शहर भाजप बचाव निर्धार मेळाव्यात झाली. शिवस्मारक सभागृहात शहर भाजपचे माजी अध्यक्ष कर्नल प्रभाकर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. नगरसेवक नरसूबाई गदवालकर, पांडुरंग दिड्डी यांच्यासह सात नगरसेवक उपस्थित होते. देशमुखांकडे नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व नसल्याची टीका झाली. लिंगायत समाजाचे नेतृत्व करता, पण सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या रखडलेल्या कामाचा पाठपुरावा केला नाही, असा आरोप झाला. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची झालेली बदली रद्द होऊ नये, असेच देशमुखांना वाटत होते, आदी गंभीर आरोप या वेळी करण्यात आले. नगरसेविका मोहिनी पत्की, वीरभद्रेश्वर बसवंती, राम तडवळकर यांनीही नेतृत्वावर टीका केली. माजी नगरसेवक बंडोपंत कुलकर्णी, नागेश वल्याळ, शिवलाल काळे, बाशाभाई शेख, रमाकांत पिसे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेविका विजया घोडके, सातप्पा चिनकेरी, मधू वडनाल, दत्तात्रय कल्पवृक्ष, शशी थोरात आदी उपस्थित होते. सुरेश पाटील यांच्या जवळचे नगरसेवक अंबिका पाटील, सुवर्णा हिरेमठ आदी गैरहजर होते.
खुशामतखोरांना कामे
नगरसेवक सुरेश पाटील यांनीही घणाघाती हल्ला केला. त्यांनी चमचेगिरी करणा-यांना कामे दिली. त्यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. ‘शहर मध्य’मध्ये निर्धार मेळावा नसून तो तडजोड मेळावा असल्याची टीका केली. ‘पक्ष आहे म्हणून किंमत आहे. त्यांच्यात हिंमत असेल अपक्ष निवडणूक लढवावी. मीही अपक्ष लढवतो. कोणात काय ताकद आहे ते कळेल. त्यांनी आमने-सामने चर्चा करावी,’ असे ते म्हणाले. निर्धार मेळाव्यात रामचंद्र जन्नू यांनी दिलेल्या जेवणावळीवर टीका केली.
माझ्याविरोधात चार लाख दिले
नगरसेवक जगदीश पाटील यांनीही टीकेची झोड उठवली. महापालिकेच्या निवडणुकीत बाबूराव जमादार यांना माझ्याविरुद्ध बंडखोरी करायला लावत चार लाख रुपये दिले. काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार दीपक साळुंखे यांच्याकडून 35 लाख घेतले, असा आरोप केला.
नेतृत्व बदल, आमची मागणी
नगरसेविका रोहिणी तडवळकर म्हणाल्या की, महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर असताना अध्यक्षांकडून त्रास झाला. पक्षातील महिला नगरसेवकांबद्दल निंदा केली जात आहे. आम्हाला सन्मान हवा आहे. आम्ही हतबल झालो आहोत. नेतृत्व बदलण्याची मागणी आम्ही करत आहोत.