आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शहर मध्य’ मागू; दिले नाही तर हिसकावून घेऊ : निर्धार मेळाव्‍यात शिवसेनेला बनसोडेंचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘शहर मध्य विधानसभा मतदार संघातून नेहमी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे घेऊ. ते मागून मिळत नसेल तर हिसकावून घेऊ,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे खासदार शरद बनसोडे यांनी शिवसेनेला आव्हान दिले. त्यावर ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी दिल्या.

अ‍ॅचिव्हर्स फंक्शन हॉलमध्ये शनिवारी भाजपचा ‘शहर मध्य निर्धार मेळावा’ झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. बनसोडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव केला. यामुळे अधिकारी मी सांगितलेली विकासकामे करत आहेत. लवकरच सोलापूरला तीर्थस्थळ आणि पर्यटनाचा दर्जा मिळवून घेणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर आता विधानसभेत त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचाही पराभव करून तेथे भाजपचा आमदार निवडून आणा. कॉँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसने केलेल्या पाप आणि भ्रष्टाचाराचा जनतेला विसर पडलेला नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रवर भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार सिद्रामप्पा पाटील यांनीही विधानसभेत भगवा फडकवण्याचे आवाहन केले. राष्‍ट्रवादी आणि कॉँग्रेसचे काही कार्यकर्ते यावेळी भाजपत प्रवेश करताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
यावेळी नगरसेवक अशोक निंबर्गी, नरेंद्र काळे, पांडुरंग दिड्डी, अविनाश पाटील, संजय कोळी, कृष्णाहरी दुस्सा, अमर फुदाले, शिवानंद पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, इंदिरा कुडक्याल, शोभा बनशेट्टी, शशिकला बत्तुल, मंगला पाताळे आदी नगरसेवकांसह प्रभाकर जामगुंडे, प्रकाश मारता, रामचंद्र जन्नू, आप्पासाहेब चौगुले, रमेश व्हटकर, बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील, बाबूराव घुगे, चन्नवीर चिट्टे, डॉ. रफिक सय्यद, शंकर वाघमारे, श्रीनिवास दायमा आदी उपस्थित होते.
भाजपमध्ये अनेक मर्द : विजयकुमार देशमुख
‘शहर उत्तर’ किंवा ‘मध्य’मध्ये निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये अनेक मर्द आहेत. बाहेरच्या कोणालाही घेऊन उमेदवारी दिली जाणार नाही, असे शहराध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले. शहर मध्य मतदार संघ शिवसेनेकडून घ्यायचा आहे. शिवसेना हा मित्रपक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याशी भांडण करायचे नाही. आपला शत्रू तर कॉँग्रेस-राष्‍ट्रवादी आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला पाडून भाजपचा उमेदवार निवडून आणा. युतीमध्ये राहूनच हा लढा जिंकायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.