आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळस यांची नजर दुसर्‍या टर्मवर; महायुतीतच रस्सीखेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांनी दुसर्‍या टर्मसाठीही जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला ग्राह्य न झाल्यास निवडणूक आणखी सोपी जाईल. हा हेतू समोर ठेवून आमदार डोळस यांनी जानकर यांचा दाखला वैध ठरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली आहे. या शिवाय जिल्हा परिषद सदस्य मोहन लोंढे, प्रा. चांगदेव कांबळे, मळोलीचे राजेश गुजर हेही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. त्यांनीही जनसंपर्क वाढवून उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या परीने जोर लावला आहे. येथे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय खासदार विजयसिंह मोहिते व जयसिंह मोहिते यांच्यावर अवलंबून आहे.
भाजपने गतवेळी पूर्णा येथील माजी मंत्री दिलीप कांबळे यांना येथे उमेदवारी दिली होती. त्यावेळी तिसर्‍या क्रमांकाची मते कांबळे यांना मिळाली होती. हा मतदार संघ पूर्वी भाजपचा होता आणि आताही भाजपकडेच राहील. यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील यांनी सांगितले. सध्या राष्ट्रवादीत असलेले निमगावचे मार्तंड साठे हे भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. माळशिरसचे सुनील लोखंडे व खुडूस येथील अतुल सरतापे हेही भाजपमधून उमेदवारी मागत आहेत.
माळशिरसमधून मनसेचा उमेदवार आपणच असे समजून तालुका उपाध्यक्ष किरण साठे हेही कामाला लागले आहेत. हळूहळू इच्छुकांची भाऊगर्दी वाढत आहे. जनसेवा संघटना या निवडणुकीत उमेदवारी देणार का हा मुद्दा सध्या कळीचा बनून राहिला आहे. माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते याबाबत सध्या मौन बाळगून ‘वेट अँन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य डॉ. धवलसिंह मोहिते सध्या भाजप किंवा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नामदेव वाघमारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट बघत आहेत.