आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीला उभा राहणार; पक्ष अद्याप ठरलेला नाही मात्र गावदौरे-भेटीगाठी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा- करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी कृषी क्षेत्रावर प्रचाराचा सारीपाठ मानत आमदार शामल बागल यांच्यासह संचालिका रश्मी बागल-कोलते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माढय़ाचे संजय शिंदे आदी नेतेमंडळी तयारीला लागली आहेत.

तालुक्यातील 118 गावे तर माढा तालुक्यातील 36 गावांत जाऊन मतदारांसोबत चर्चा करत आहेत. ‘निवडणुकीला उभा राहणार आहे, माझा पक्ष अद्यापपर्यंत ठरलेला नाही. मात्र मला ही निवडणूक लढवायची आहे. आमदार होऊन जनतेची कामे करावयाची आहेत,’ अशा शब्दात भूमिका मांडत आहेत. निवडणुकीचा इतिहास पाहिला असता, याठिकाणी मतदारांनी पक्षीय राजकारणाला विशेष असे महत्त्व दिल्याचे दिसून येत नाही. गेल्या 40 वर्षांच्या इतिहासात केवळ एक वेळा माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेकडून तर शामल बागल या राष्ट्रवादीकडून आमदार झाल्याचे चित्र आहे. बाकी या ठिकाणी अपक्ष, गट-तट या गोष्टीलाच महत्त्व असल्याचे स्पष्ट होते. गेल्या लोकसभेलाही तालुक्यातील सर्वच नेतेमंडळी राष्ट्रवादीकडे जमा झालेले असताना विरोधातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना 15 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. मोदींच्या लाटेचा परिणाम जनतेपेक्षा याठिकाणच्या पुढार्‍यांवरच जादा झालेला आहे. यामुळे अपक्ष नको कोणत्यातरी पक्षाचे तिकीट घेऊनच निवडणूक लढूया असे म्हणून तालुक्यातील नेतेमंडळी पक्षाच्या संपर्कात आहेत.
पक्ष तिकिटासाठी सोयीनुसार काहीजण अंधारातून तर काहीजण उजेडातून मागणी करताना दिसत आहेत. विशेषत: कोणत्याही पक्षाने अद्यापपर्यंत इच्छुक उमेदवारास तुला तिकीट पक्के आहे, तू कामाला लाग असे सांगितलेले नाही. प्रामुख्याने शिवसेना, भाजप, महायुतीकडून नारायण पाटील हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रचाराची सभा गेल्या महिन्यात करमाळा येथे घेऊन जोरदार तयारी चालू केली आहे. तरीपण पक्षाचे तिकीट मिळेपर्यंत त्यांना खरे समाधान मिळणार नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. पक्षाकडून शामल बागल, रश्मी बागल प्रबळ दावेदार आहेत. तरीही इतर अनेक पक्षाने तिकीट देऊन संधी दिल्यास आपण का आमदार होऊ नये, या विचाराने गर्दी केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास घुमरे, सवितादेवी राजेभोसले ही मंडळी पक्षर्शेष्ठींच्या संपर्कात आहेत.
काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष शिवलिंग सुकळे, माजी आमदार जयवंतराव जगताप इच्छुक आहेत. मतदारांशी गावोगावी जाऊन संपर्क वाढवलेला आहे. तिकीट दिले तर ठीक नाही तर अपक्ष या भूमिकेने काम सुरू आहे. राजकारणात जातीचा फॅक्टर हा विकासकामापेक्षा जादा महत्त्वाचा ठरत आहे. एकाच समाजातील दोन किंवा दोनपेक्षा जादा उमेदवार रिंगणात उभे राहिल्यास याचा फायदा हा नेहमीच विरोधी गटाला, पक्षाला झालेला आहे. ही वस्तुस्थिती असून आजतरी राजकीय वातावरण परिवर्तनवादी विचाराकडे झुकल्याचे चित्र आहे.
बाहेरचा उमेदवार चालेल?
आतापर्यंत प्रत्यक्ष प्रवेश न केलेले माढय़ाचे विठ्ठल शुगरचे चेअरमन संजय शिंदे हे प्रचारात आघाडीवर आहेत. माढा तालुक्यातील 36 गावच्या जहागिरीवर करमाळा तालुक्यातील 118 गावांचा राजकीय मुलूख आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ते अपक्ष उभारणार अशी चर्चा आहे. मात्र, ते अंधारातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा आहे. मतदार त्यांना कितपण स्वीकारणार? हा खरा प्रश्न आहे. मतदारांना बाहेरच्या तालुक्यातील नेत्यांनी वरिष्ठ पातळीवरून नेतृत्व केल्याचे रुचते. प्रत्यक्षात निवडणूक लढवणे रुचत नाही. याआदी मोहिते बंधूंचा प्रवेश तालुक्यातील जनतेला रुचलेला नाही. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत प्रतापसिंह मोहिते यांच्या पॅनलचा पराभव झाला होता.