पंढरपूर- गेल्याचौदा वर्षांच्या राजकीय जीवनात सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. (कै.) वसंतराव काळे यांनाही खडतर राजकीय प्रवासात शिवसेनेने न्याय दिला. माझ्या राजकीय कारकिर्दीतील वनवास संपला आहे. आता शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा भगवामय होईल, असा विश्वास सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी व्यक्त केला. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गुरुवारी भटुंबरे येथील संत तुकाराम बाबा खेडलेकर मठात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे म्हणाले, ‘कल्याणराव काळे यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. माढा, मोहोळ, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय सुकर झाला आहे. काळे यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांची झालेल्या गर्दीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवू.’ या वेळी नामदेव महाराज लबडे, शिवाजी सावंत, साईनाथ अभंगराव, जयसिंग ढवळे, महिला आघाडीच्या ज्योती कुलकर्णी, दीपक खोचरे उपस्थित होते.