आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी गृहित धरून काँग्रेसवाल्यांचा शहर-जिल्ह्यात प्रचार धडाक्यात सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उमेदवारीनिश्चित समजून जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांनी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. एकीकडे आघाडीचा तिढा सुटत नसताना उमेदवारीची खात्री असलेल्या विद्यमान आमदारांनी प्रचाराच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. तर उमेदवारीसाठी अन्य इच्छुक उमेदवारांची मात्र राजधानी वारी सुरू आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता केवळ काही आठवडे उरले आहेत. मात्र, अद्याप अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही वेग आलेला नाही. एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे निवडणुकीला अपेक्षेप्रमाणे रंग चढलेला नाही. उमेदवारीचा गंुता सुटत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्यास प्रचारासाठी वेळ कमी पडणार आहे. उमेदवारीसाठी राजधानीच्या वाऱ्या करणाऱ्यांसमोर ही अडचण आहे.
सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्याचे अपक्ष आमदार भारत भालके यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडीच्या जागा वाटपात तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. पण, भालकेंसाठी काँग्रेसने तो मतदारसंघ मिळवला आहे. त्या बदलत्यात काँग्रेस त्यांच्याकडील बार्शी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची शक्यता आहे.
अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गावोगावी भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू केला आहे. स्थानिक नेत्यांना आपलसं करण्याची व्यूहरचना म्हेत्रे यांनी आखली आहे. पण, त्याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे महिबूब मुल्ला, जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड यांनीही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
म्हेत्रे पाटील यांच्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळलेले मतदार आपल्याला संधी देतील, अशी आशा त्यांना आहे. मुल्ला शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शहर उत्तर मतदारसंघात माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी उमेदवारी मिळणार असे गृहित धरून गाठीभेटी सुरु आहेत. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी प्रभागांमध्ये दौरे सुरू केलेत.
सांगोला बार्शीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके हेही सोलापूर दक्षिणमधून इच्छुक असून मतदारांच्या गाठीभेटींवर त्यांचा भर आहे. काँग्रेसने उमेदवारांची अद्याप घोषणा केली नाही. तरीही, आमदार दिलीप माने प्रणिती शिंदे यांनी स्वत:चे उमदेवारी अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली आहे. आमदार माने गुरुवारी सकाळी पदयात्रा काढून उमेदवारी भरणार आहेत. तर, आमदार शिंदे शनिवारी सकाळी पदयात्रेद्वारे उमेदवारी भरतील.