आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईची मते खेचण्यासाठी सर्वच उमेदवारांचा आहे डोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मतदारनोंदणीची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे तरुणाईला भुरळ घालून त्यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांनी महाविद्यालयांसह अगदी खासगी क्लासेसही "टार्गेट’ केले आहेत. युवक- युवतींच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देऊन पक्षाचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत पोचविला जात आहे. विधानसभा निवडणुकीत तरुणाईकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. पक्षातही तरुणांची संख्या अल्पच होती; पण अलीकडे विविध पक्षांनी युवक, युवती विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून तरुणाईची नाळ पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला. परिणामी युवक संघटनांचा थेट पक्षांच्या नेत्यांशी संपर्क आला. दुसरीकडे शासनानेही लोकसभा निवडणुकीपासून मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर दिला आहे. या निमित्ताने नव्याने मतदानाचा अधिकार मिळालेले युवक या नोंदणीच्या माध्यमातून जोडले गेले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महिनाभर आधी मतदार नोंदणी राबविली. त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण, तरुणी मतदार झाले. मोठ्या संख्येने तरुण मतदार जिल्ह्यात असल्याने या तरुणांपर्यंत पोचून त्यांची मते "कॅश’ करण्यावर बहुतांशी उमेदवारांनी भर दिला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील महाविद्यालयांसह खासगी क्लासेस, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील युवक, युवती, तरुण मंडळांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या पक्षाचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत पोचवण्यावर भर दिलेला आहे, तसेच तरुणाईच्या पक्ष लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत याचीही माहिती घेतली जात आहे. खासगी क्लासेसपर्यंत प्रचाराचा धुराळा पोचला आहे.

युवकांच्या मतांवर विजयाची मुहूर्तमेढ
तरुणांच्याविविध संघटना, मंडळांना विविध आमिषे दाखवून त्यांची मते बांधून घेण्यातही काही उमेदवार यशस्वी झाले आहेत. तरुणाईला काय बदल अपेक्षित आहेत, याचीही चाचपणी यानिमित्ताने उमेदवार करत असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या योजनांचा समावेश केला आहे. वाढती बेरोजगारी, स्पर्धात्मक युगात विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी लागणारी केंद्रे उभारण्यावर ही आगामी काळात भर दिला जाण्याची घोषणा या जाहीरनाम्यातून केली जात आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघ आघाडीवर असल्याचे चित्र आहे.उमेदवारांकडून महाविद्यालये टार्गेट; युवक-युवतींच्या गाठीभेटीवर दिला भर