आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवरून ‘एटीएम’चे पासवर्ड मागतोय? फसवणुकीचे सायबर जाळे, व्हा सावध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘आपल्याला अमूक कंपनीकडून लॉटरी लागली आहे. आपली संपूर्ण माहिती द्या, अमूक बँकेतून बोलतोय डेबीट कार्ड, एटीएम कार्डाचे नूतनीकरण करणार आहे. आपला पासवर्ड सांगा, तुम्ही पैसेजिंकला आहात, बँक अकाऊंट नंबर, पत्ता द्या,’ असे मेसेज किंवा फोन आल्यास सावध व्हा. कारण आपली फसवणूक होऊ शकते. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनवरून मागत नाही. शंका आल्यास बँकेत प्रत्यक्षात जाऊन चौकशी करा अथवा पोलिसांची मदत घ्या.

असाच एक बनावट फोन उमेश माळवे यांना आला. बँकेचे खाते नंबर, एटीएमचे पासवर्ड नंबर ते विचारत होते. दोन वेळेस त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तिसर्‍यांदा पुन्हा फोन आल्यानंतर त्यांनी आपले खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेमध्ये संपर्क साधला. त्यावेळी फसवणुकीचा प्रयत्न होत असल्याचे उघडकीस आले.

पाच जणांची फसवणूक
मागील तीन महिन्यात ऑनलाईन बँकिंगद्वारे डॉक्टर, व्यापारी, शेतकरी, तरुण अशा एकूण पाच जणांची फसवणूक झाली आहे. यासंबंधी पोलिसात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. काहीजण फसवणूक झाली तरी तक्रार देण्यास पुढे येत नसल्यामुळे या घटना पोलिस रेकॉर्डवर येत नाहीत.

फसवणारी टोळी दिल्लीची
ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, मोबाइलवर मेसेज पाठवून वैयक्तिक माहिती घेऊन फसवणूक करणारी टोळी दिल्लीत आहे. सायबर क्राइमच्या भाषेत या फसवणुकीला नायजेरीयन फ्रॉड म्हणतात. याबाबत आमच्याकडे काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आहे. ते मोबाइल नंबर बनावट अथवा दुसर्‍यांच्या नावे असल्याचे तपासात पुढे आले आहे. फसवणूक होऊ नये म्हणून एटीएम, मोबाइल, इ-मेल याचा वापर जबाबदारीने व जपून करा. फसवणूक झाल्यानंतर आरोपींचा शोध घेणे कठीण असते.
-नितीन कौसडीकर, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा