आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’मध्ये आहे केवळ ठणठणाट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दिवाळी खरेदीची धूम बाजारपेठेत अजूनही कायम आहे. परंतु पैशाअभावी बहुतांश एटीएम केंद्रे गुरुवारीच बंद झाली. त्यामुळे ग्राहकांची धावपळ होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या केंद्रांमध्येच पैशाचा ठणठणाट जाणवतो. शनिवारपासून (ता. 2) शासकीय कार्यालये तीन दिवसांसाठी बंद असणार आहेत. बँकाही शनिवारी अर्धवेळ सेवा देऊन शटर ओढतील. त्यानंतर थेट मंगळवारीच (ता. 5) उघडतील. त्यामुळे ग्राहकांची धावपळ अधिक होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक संस्थांनी कर्मचार्‍यांना आगाऊ वेतन, नियमित वेतन आणि बोनस दिवाळीनिमित्त दिलेला आहे. या रकमा कर्मचार्‍यांच्या वेतन खात्यात जमा होतात. बहुतांश चाकरमान्यांचे वेतन 31 किंवा 1 तारखेलाच झालेले आहेत. त्यामुळे एटीएमवर ताण पडलेला आहे. शुक्रवारीच एटीममध्ये रोकड संपली आणि पुढील तीन दिवस बँका बंद राहाणार आहेत. त्यामुळे लोकांपुढे मोठय़ा प्रश्नच उभा राहिला आहे.

पैसे असलेले एटीएम केंद्रांचा शोध ग्राहक घेत फिरत होते. अशा काही केंद्रांवर शनिवारी मोठय़ा रांगा पाहावयास मिळाल्या. मात्र, काही तासातच त्या एटीएमही रिकम्या झाल्या. त्यामुळे लोकांची निराशा झाली.

केंद्रांवर असा येतो पैसा
एटीएम केंद्रात पैसे भरणार्‍या एजन्सीज आहेत. त्यांच्याकडील यंत्रणेसोबत ही केंद्रे जोडली गेल्याने केंद्रातील यंत्रात किती पैसे शिल्लक आहेत, किती हवेत याची वर्तमान स्थिती आपोआप कळत असते. त्यानुसार संबंधित एजन्सी बँकेकडे पैशाची मागणी नोंदवून केंद्रात भरत असत. परंतु बँकांच्या सुट्यांमध्ये एजन्सीचे काम चालत नाही. त्यामुळे पैशाअभावी केंद्रे बंदच ठेवावी लागतात.

एजन्सींना सूचना दिलेल्या आहेत
दिवाळी सुट्यांमध्ये एटीएम केंद्रांत पुरेसे पैसे ठेवण्याबाबत एजन्सींना सूचना दिल्या आहेत. केंद्रातील पैशांची वर्तमान स्थिती एजन्सींना आपोआपच कळत असते. त्यानुसार पैसा येत जाईल. त्यामुळे ग्राहकांची सोय होईल.’’ डॉ. चंद्रशेखर बारगजे, व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय


स्थानकांमध्ये सेवा द्या!
दिवाळीच्या सुट्या असल्याने बहुतांश नोकरदार वर्ग आपल्या गावाकडे, नातेवाइकांकडे निघाला आहे. खिशात फक्त एटीएम कार्ड घेऊन निघालेल्या या प्रवाशांना स्थानकावरील एमटीएम केंद्रे सेवा देण्यात हतबल ठरली. दोनपैकी एक पैशाअभावी बंद. दुसर्‍या केंद्रावर रांगा. गाड्या सुटताहेत म्हणून ग्राहकांची इतर केंद्रांवर धाव. असे चित्र रेल्वे आणि एसटी स्थानक परिसरात आहे. बहुतांश केंद्रांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. निदान स्थानक परिसरातील एटीएममध्ये तरी पुरेसे पैसे ठेवून सेवा द्यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.