आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर मनपा सुरक्षा चव्हाट्यावर; अतिक्रमणविरोधी अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी वसंत पवार यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला. ते डी-मार्टजवळील चायनीज पदार्थ विक्रेत्यांची बेकायदा खोकी काढत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. याचा सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांनी निषेध केला आहे. पोलिस आणि प्रशासनाने अधिकार्‍यांना पुरेशी सुरक्षा दिली पाहिजे, असे मत व्यक्त झाले.

कामगार संघटनेचा हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा
महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी वसंत पवार यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिका कामगार संघटना कृती समिती सोमवारी मोर्चा काढणार आहे. त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी साडेदहाला सुरुवात होईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिली. प्रथम महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर मोर्चा चार पुतळा, सरस्वती चौक, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, बेगम पेठ, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येईल. तेथे निषेध सभा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात येणार आहे. यानंतर मोर्चेत सहभागी झालेले महापालिकेच्या हिरवळीवर थांबतील आणि प्रमुख पदाधिकारी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना निवेदन देतील. यानंतर महापालिकेच्या हिरवळीवर चर्चा करून मोर्चाचा समारोप करून कर्मचारी कामावर रुजू होतील, असेही त्यांनी सांगितले.

सर्वांनी सहकार्य करावे
अधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍यांवर कडक कारवाई करावी. सरकारी जागेत अतिक्रमण करणे चुकीचेच आहे. अतिक्रमण करताना लोकांनी विचार केला असता तर ही वेळ आली नसती. सोलापूर सुंदर ठेवण्यासाठी आयुक्तांनी मोहीम सुरू केली आहे. ती योग्य आणि स्वागतार्ह आहे. सर्वांनी सहकार्य करावे. -कृष्णाहरी दुस्सा, विरोधी पक्षनेता

आयुक्तांना भेटा
अधिकारी असो किंवा कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करतात. अडचण असल्यास आयुक्तांना भेटणे गरजेचे आहे. हल्ला झालेले अधिकारी ठोस तक्रार करत नाहीत म्हणून कडक कारवाई होत नाही. याबाबत आम्ही पदाधिकारी सुध्दा पोलिस आयुक्तांना भेटू.
- महेश कोठे, सभागृह नेता

अधिकरी वसंत पवार यांना शनिवारी जबर मारहाण झाली होती.

हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी
अतिक्रमणावर अनेकांचा संसार चालत आहेत. ते उद्ध्वस्त होत असल्याचे पाहताना नागरिकांच्या भावना अनावर होतात. त्यातून असे प्रकार घडतात. हल्लेखोरांवर कारवाई व्हावी.
- इब्राहिम कुरेशी, सभापती, स्थायी समिती

कोणीही कायदा हातात घेऊ नये
बेकायदा बांधकाम काढायलाच हवे. त्या प्रक्रियेत कोणीही अडचण निर्माण करू नये. प्रशासनाकडून जर पक्षपातीपणा होत असेल तर त्यांनी ते आयुक्तांच्या नाही तर पदाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून द्यावे. नागरिकांनी सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. अधिकार्‍यांवर हल्ला चुकीचाच आहे.
-हारुण सय्यद, उपमहापौर

.. हा तर माझ्यावर हल्ला
अधिकार्‍यावरील हल्ल्याने सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. तत्काळ साहित्य खरेदी करण्याचे आदेश दिलेले आहेत. काही तक्रार असेल तर माझ्याकडे द्यावी. दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करेन. यापुढे मोहिमेची नेटकी व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून देण्यात येईल. महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍यांना हात लावणे म्हणजे मलाच हात लावण्याचा प्रकार असल्याचे मी मानतो. कर्मचार्‍यांनी घाबरण्याचे कारण नाही.
-चंद्रकांत गुडेवार, आयुक्त