आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारपासून रिक्षा तपासणी मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रिक्षाचालकांच्या मनमानी भाडे वसुलीला आळा बसावा यासाठी राज्य शासनाने 1 जुलै 2012 पासून परमिटधारक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती केली. मात्र या नियमाची सोलापुरात म्हणावी तशी अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे शहरातील रिक्षांना मीटरची सक्ती करण्यासाठी गुरुवारपासून तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रभारी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले.

सोलापुरात पाच हजार परमिट असलेल्या रिक्षा आहेत. त्यापैकी केवळ 1 हजार रिक्षांनाच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. प्रत्येक रिक्षाला मीटरची सक्ती करण्यासाठी गुरुवारपासून शहर हद्दीत तपासणी मोहीम सुरू होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर, रिक्षा चालकाजवळ परवाना कागदपत्रे यांची तपासणी करण्याबरोबरच अवैध प्रवासी वाहतूक, स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे. मीटर बसवले नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मीटर नसलेल्या रिक्षाचा चालक व मालक वेगळा असेल तर त्या रिक्षा चालकाकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. जर रिक्षाचा चालक व मालक एकच असेल तर त्याच्याकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. स्क्रॅप रिक्षा जप्त करणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

चार पथकांची नेमणूक
रिक्षांवर कारवाई करण्यासाठी आरटीओकडून चार पथके तयार करण्यात आली आहेत. यात प्रत्येक पथकात एक मोटार वाहन निरीक्षक व दोन साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असणार आहे. हे बारा तास सोलापुरातील विविध भागात जाऊन कारवाई करणार आहेत. यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची देखील मदत घेण्यात येणार आहे.