सोलापूर - मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास अचानक सुटलेल्या वादळी वार्याने शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर झोपडपट्टी भागांतील घरांवरील पत्रे उडाले. प्रभाग क्रमांक 18 मध्ये विडी घरकुल परिसरातील अनेक नगरांमध्ये घुसलेल्या वादळाने सुमारे 200 घरांचे नुकसान केले. यातील 50 घरे जवळजवळ उद्ध्वस्त झाली. दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
प्रभाग क्रमांक 18 मधील मोमीन नगर, मेघश्याम नगर, गुरू राघवेंद्र नगर, भाग्यवंती नगर, नागेंद्र नगर, वैष्णवी नगर, बिस्मिल्ला नगर, सग्गम नगर, पवन नगर, राजलक्ष्मी नगर, समाधान नगर, साईबाबा नगर आदी नगरांमध्ये पत्र्याची सुमारे पन्नास घरे उद्ध्वस्त झाली. या घरांतील फक्त फरशाच शिल्लक राहिल्या. दरवाजा, खिडकी, पत्रे, विद्युत मीटरसह घरे उडून गेली. संसारोपयोगी साहित्य घेऊन महिला रडत बसल्या होत्या. त्या परिसरातील इतर लोक व नातेवाईक त्यांना धीर देत असल्याचे पाहायला मिळाले.
आमदार प्रणिती शिंदे, महेश कोठे आले मदतीसाठी धावून
आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत:च्या पूर्व भाग संपर्क कार्यालयात त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करून दिली. प्रभाग क्रमांक 18 मधील गरजूंना नगरसेवक महेश कोठे यांनी गुरू राघवेंद्र नगर येथील सिद्धार्थ मराठी विद्या मंदिर येथे तात्पुरती राहण्याची सोय करून दिली. तसेच प्रभाग क्रमांक 44 मधील केशवनगर येथे तीन घरांचे पत्रे उडून गेले. या लोकांना नगरसेविका फिरदोस पटेल यांनी तर नई जिंदगी येथे स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. तसेच आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.
तातडीने पंचनामे करणार
शहरात ज्या ज्या भागात वादळी वार्याने नुकसान झाले आहे त्याचे तातडीने पंचनामे केले जातील आणि लवकरात लवकर त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त
पत्रे, वासे देण्याचे काम सुरू
प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन विचारपूस केली. तसेच ज्यांची घरे पूर्ण उडून गेली अशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. सर्कल अधिकार्यांना बोलावून घेतले. लवकरच पंचनामे सुरू होतील. परंतु जे खूपच गरीब आणि गरजू आहेत, अशांना संध्याकाळपासून पत्रे आणि वासे देण्याचे काम सुरू केले. प्रणिती शिंदे, आमदार
विजेचे 31 खांब पडले
मंगळवारी दुपारच्या वादळात शहरातील विजेचे 31 खांब पडले असून एक ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. एकंदरीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विडी घरकुल भाग वगळता इतर ठिकाणी वीज दुरुस्तीचे काम सुरू असून रात्री वीजपुरवठा सुरळीत होईल. परंतु विडी घरकुल भागात सर्वाधिक नुकसान झाले असून तेथील वीजपुरवठा बुधवारी दुपारपर्यंत सुरू होईल. आर. आर. कांबळे, कार्यकारी अभियंता, महावितरण