आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बारावीनंतर करता येईल ‘बी. एड.’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षणशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमास आता थेट बारावीनंतर प्रवेश घेता येणार आहे. मात्र, हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे. सध्या एक वर्षाच्या या अभ्यासक्रमास अन्य कोणत्याही विषयातील पदवी धारण केल्यानंतर प्रवेश मिळत असे. नवा धोरणात्मक बदल 2015-16 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण संस्थेने (एनसीटीई) घेतला आहे.

‘एनसीटीई’ने बी. ए. बी. एड. आणि बी.एस्सी. बी. एड. हे दोन अभ्यासक्रम बारावीनंतर सुरू करण्याचे आदेश विद्यापीठ व महाविद्यालयांना दिले आहेत. त्याचबरोबर एक वर्षाचे असलेले बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून दोन वर्षांचे करण्यात येत आहेत. चांगल्या शिक्षकांची गरज ओळखून हे बदल करण्यात आले आहेत. एका वर्षात शिक्षक म्हणून पूर्ण प्रशिक्षण मिळणे अवघड जात होते. बीएड होऊनही त्यांचे ज्ञान वाढत नव्हते. आता चार वर्षांचा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाला जास्त वेळ मिळेल आणि त्यातून चांगले शिक्षकही घडतील, अशी आशा संस्थेने व्यक्त केली आहे.
बी. एड.ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू
एका वर्षाच्या बी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 22 मेपासून ऑनलाइन सुरू आहे. यंदापासूनच अभ्यासक्रम दोन वर्षांचे होईल, अशी चर्चा होती. त्याला पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बी.एड.ला विद्यार्थी प्रतिसाद कमी होत आहे.