आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोंडस तान्हुलीला तिच्या मातेनेच केले निराधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बुधवारी सकाळी सातची वेळ. नुकतीच सिद्धेश्वर एक्स्प्रेस फलाट एकला लागलेली. अचानक एक महिला आपले 20 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक फलाट एकवरील वाडीच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाजवळ सोडून पसार होते. फूड स्टॉलच्या मॅनेजरच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार लक्षात आला. लोहमार्ग पोलिसांनी या तान्हुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले.

फलाटावरील पादचारी पुलाजवळ अग्रवाल यांचा खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. गर्दीचा फायदा घेत एक महिला स्टॉलच्या मागील भागात लाल रंगाच्या चादरीत गुंडाळलेले बाळ ठेवून पसार झाली. स्टॉलचे मॅनेजर समीर शेख हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार हिरवी साडी परिधान केलेली ही महिला सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून उतरली होती. पांघरूणात बाळ व्यवस्थित झाकलेले होते. त्यामुळे कुणालाही शंका आली नाही. दीड ते पावणेदोन तासांनंतर त्या पांघरूणातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ गेल्यानंतर अगदी तान्हुलं बाळ दिसले. बाळ रडत असल्यामूळे त्यास चमचाने दूध पाजण्यात आले. नंतर स्थानक उपव्यवस्थापकांना (वाणिज्य) माहिती देण्यात आली.

सीसीटीव्ही कॅ मेरे कुचकामी
सोलापूर रेल्वेस्थानकावर सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. फलाट एकवर चार कॅमेरे आहेत. तरीदेखिल त्या बाळाला सोडणार्‍या महिलेचे चित्रण झाल्याचे आढळून आले नाही. रेल्वे पोलिसांना या बाबत विचारणा केली असता, वाडी दिशेचा पादचारी पूल कॅमेर्‍यांच्या रेंजमध्ये येत नाही. त्यामुळे त्या महिलेचा शोध घेता आला नाही, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून या महिलेने सकाळी 8.25 वाजता निघणार्‍या सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसने पलायन केले असावे.

अशी हलली यंत्रणा
पाहणार्‍यांनी 8 वाजून 45 मिनिटांनी स्थानक उपव्यवस्थापकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लगेचच डॉक्टरांना स्थानकावर बोलावून घेतले. 10 मिनिटांत डॉक्टरांची टीम दाखल झाली. त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन आरोग्याची तपासणी केली. बाळाचे आरोग्य व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर तान्हुलीला स्टेशन व्यवस्थापकांच्या चेंबरमध्ये रेल्वे पोलिस, स्थानक उपव्यवस्थापक यांच्या समोर लोहमार्ग पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले.