आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ्र पोषाखातील लाखोंचा मानवी सागर; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकेश्वर, नमाज, रोजा, जकात आणि हज हे इस्लामचे पाच स्तंभ. यापैकी हजचा मोसम सुरू आहे. हजचे विधी करत आपापल्या कुटुंबीयांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी दुआ मागत आहेत. सोलापूरहून गेलेल्या जत्थ्यात हाजी उस्मान जमादार सामील आहेत. दरसाल जमादार यात्रेकरूंना येथे हजच्या विधींबाबत प्रशिक्षण देत असतात. आतापर्यंत त्यांनी सातवेळा हजयात्रा केली आहे. जमादार यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधून तेथील हजयात्रेसंदर्भात जाणून घेतले. जगभरातून आलेल्या सुमारे १४ लाख हाजींचा पांढऱ्या शुभ्र पोषाखातील जणू मानवी सागर येथे अवतरल्याचे डोळ्यांना सुखावणारे दृश्य असल्याचे जमादार यांनी सांगितले.

सुदैवाने यंदाची माझी ही सातवी वेळ आहे. १९८३ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा आणि आता सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला अाहे. हजयात्रेदरम्यान सैतानाच्या प्रतिकाला खडे मारताना नेहमी चेंगराचेंगरी होत असे. मात्र, आज चार मजली इमारत उभी करून वेळापत्रक केले आहे.

‘सौदी अरबमध्ये बकरीद शनिवारी साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी आम्ही मीनामध्ये होतो. त्या दिवशी सकाळी दहा वाजता बकऱ्याची कुर्बानी देण्यात आली. तद्नंतर डोक्यावरील केस काढण्यात आले. यानंतर आम्ही नवीन कपडे परिधान केले. दुपारी जोहरची नमाज अदा केल्यानंतर सैतानाच्या प्रतिकाला खडे मारण्यासाठी आम्ही गेलो. येथे ऊन भयानक असते. त्यामुळे हजचे सर्व अरकान (विधी) पूर्ण करताना अंगाची लाहीलाही होत होती. परंतु, आता सर्वत्र वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले आहेत.’

‘इथे लाखोंच्या संख्येत हजयात्रेकरू येऊनसुद्धा कुठेही घाण दिसत नाही. पावलोपावली सेवक मदतीला धावून येत आहेत. यात्रेकरूच्या गळ्यात ओळखपत्र व त्यांच्या मंडपाचा नकाशा आहे. त्यामुळे एकही हजयात्रेकरूचा मार्ग चुकत नाही.'

वाहतुकीची कोंडी नाही
‘ येथे जागोजागी रुग्णालये आहेत. काल एका व्यक्तीला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. अवघ्या काही सेकंदांमध्ये तेथे रुग्णवाहिका आली आणि त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सर्वत्र पाणी, बाथरुमची तर उत्तम सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लाखो लोक येथे जमलेले असताना आम्ही एकदाही वाहतुकीची कोंडी पाहिलीच नाही. परिसरावर यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चोवीस तास हेलिकॉप्टर फिरत असते. एकंदरीत तेथील सुविधा न भूतो आहे, इतकेच म्हणावे लागेल.’