आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी झाली बाल सिद्धरामास श्री मल्लिकार्जुनांची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामांनी 68 हजार वचने रचल्याचा उल्लेख त्यांच्या वचनांत आहे. बाल सिद्धरामांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती श्री मल्लिकार्जुन यांच्या भेटीने. श्री सिद्धरामेश्वरांच्या बालपणातील सुमारे आठशे वर्षांपूर्वीची ही कथा.
लहानपणी गुरे राखणार्‍या सवंगड्यांसोबत ते शेतात जात असत. एके दिवशी सकाळी धुळीमहांकाळ म्हणजे श्री सिद्धरामेश्वर मुलांबरोबर शेतात गेले. जाताना घरातून घेतलेला दहीभाताचा डबा सोबत होताच. इतक्यात चमत्कार झाला, समोर मोठी आमराई आणि त्यात शिवाचे देवालय दिसले. आजूबाजूला गर्द छाया, मध्यभागी वाळू आणि त्यात पाण्याचा झरा दिसला. त्याच्याकाठी शिवाची मूर्ती होती. अशी मूर्ती आणि असा चमत्कार त्यांनी कधीच पाहिला नव्हता. म्हणून मनोभावे पूजन करून बाल सिद्धरामाने शिवलिंगास विविध प्रकारची फुले आणि बिल्वपत्रे वाहिली. सोबत असणार्‍या मुलांनी आम्हास भूक लागली आहे असे म्हणताच जवळचा दहीभाताचा घास प्रत्येकाला दिला. त्या दिवसापासून रोज ही मंडळी तेथे यायची पूजा करायची, फुले वहायची.
एक दिवस प्रत्यक्ष श्री मल्लिकार्जुन जंगमाचे रूप घेऊन तेथे आले; पण चाणाक्ष सिद्धरामाने त्यांना ओळखले. त्यांनीही मूळ रूपात येऊन सिद्धारामांच्या शेतातील राळ्याचा हुरडा खाण्याची इच्छा प्रकट केली. ताबडतोब सिद्धरामेश्वरांनी तो आणला आणि श्री मल्लिकार्जुनास खाण्यास दिला. परंतु हा हुरडा खाऊन माझ्या पोटात आग पडली आहे. सिद्धरामा, मला दहीभात दे असे श्री मल्लिकार्जुन म्हणाले. तेव्हा मी आज दहीभात घेऊन येण्यास विसरलो आहे, लगेच घरातून घेऊन येतो असे म्हणत सिद्धेश्वर घरी आले.
आईकडे दहीभात मागितला, कधीही न बोलणार्‍या सिद्धेश्वरांनी आज दहीभात मागितला म्हणून आई सुग्गलदेवींनीही दहीभात दिला. ते घेऊन सिद्धेश्वर शेतात आले, परंतु तोपर्यंत श्री मल्लिकार्जुन निघून गेले. सगळीकडे शोधले तरी ते दिसेनात म्हणून सिद्धेश्वर चिंताक्रांत झाले. मल्लय्या, मल्लय्या असा धावा करू लागले. सगळ्यांना विचारू लागले की, मल्लय्या कोठे गेले? त्यावर तेथून जाणार्‍या यात्रेकरूंनी मल्लय्या श्रीशैलला असतात असे सांगितले. यावर श्री सिद्धराम मल्लय्यास भेटण्यास श्रीशैलकडे निघाले. तेथे पोहोचल्यावर एकाने श्रीशैल मल्लिकार्जुन म्हणजे एक शिवलिंग दाखवले. पण मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले आहे, असे म्हणत त्यांनी रानोमाळ, कडेकपारीत शोध घेतला पण श्री मल्लिकार्जुन भेटले नाहीत. शेवटी हताश होऊन त्यांनी एका कड्यावरून उडी मारली. पण खरी ईश्वरभक्ती पाहून मल्लिकार्जुनांनी त्यांना अधांतरी उचलून पर्वतावर आणून प्रत्यक्ष दर्शन दिले.
परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ती पाहून श्री सिद्धरामेश्वरांना अत्यानंद झाला. परमेश्वरांनीही त्यांना प्रेमाने उचलून घेत कुरवाळले व मांडिवर घेतले. असा झाला श्री सिद्धरामेश्वर व श्रीमल्लिकार्जुन यांचा भेटीचा सोहळा. त्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज यांनी सोलापुरात ‘कर्म हीच पूजा’ हा संदेश दिला.
(संदर्भ : महाकवी राघवांक रचित ‘श्रीसिद्धरामचरित्रे’ कन्नड ग्रंथातून.)