सोलापूर - भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांनी मोहोळच्या उपअधीक्षक कार्यालयातील दोघा कर्मचार्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी संघटनेने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्या बदलीची मागणी केली. दरम्यान, मोहोळच्या कार्यालयातील ते दोघे कर्मचारी कामचुकार व उर्मट असल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. दोघे एकाच कार्यालयात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले.
सरकारी कर्मचारी संघटनेचे म्हणणे...
मोहोळच्या उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक ए. डी. वाघमोडे आणि भूकरमापक एस. एस. सोनकांबळे यांना वानखेडे यांनी शिवीगाळ केल्याची मुख्य तक्रार आहे. यापूर्वीही वानखेडे यांच्या विरोधात अशाच तक्रारी आल्या होत्या. त्या वेळी संघटनेने आंदोलन छेडले असता, वानखेडे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा त्यांची दहशत सुरू झाली. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, असे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सरकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक इंदापुरे, मध्यवर्ती संघटनेचे शंकर जाधव, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे शंतनु गायकवाड, सटवाजी होटकर उपस्थित होते.
वानखेडे यांनी शिव्या नव्हे तर समज दिली होती
४मोहोळच्या उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक ए. डी. वाघमोडे आणि भूकरमापक एस. एस. सोनकांबळे यांना बोलावून बाळासाहेब वानखेडे यांनी समज दिली. त्या वेळी मी समोरच होतो. शिव्या वगैरे काहीही दिलेल्या नाहीत. उलट त्या दोघांचीच उत्तरे उर्मटपणाची होती.’’
सी. बी. पाटील, उपअधीक्षक, दक्षिण सोलापूर
त्या दोघांच्या कामाबद्दल जनतेच्या होत्या तक्रारी
मोहोळच्या उपअधीक्षक कार्यालयातील त्या दोघा कर्मचार्यांच्या कार्यशैलीबद्दल जनतेच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत वरिष्ठांकडे गोपनीय अहवाल पाठवण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकाच कार्यालयात असल्याने त्या दोघांची बदली करणे आवश्यकच आहे.’’
लीना ओहोळ, उपअधीक्षक, मोहोळ
कर्मचार्यांबद्दल अधिकार्यांचे म्हणणे...
भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘त्यांनी वाघमोडे आणि सोनकांबळे यांच्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचला. वाघमोडे हे गेल्या वर्षी 247 दिवस अनधिकृत गैरहजर होते. त्यामुळे त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली. दोन वेळा शिस्तभंगाची कारवाईही करण्यात आली. दोघे एकाच कार्यालयात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या. त्यांच्या या वर्तणुकीमुळे कार्यालयाची पर्यायाने विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे त्यांची अन्य ठिकाणी बदली करण्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने बिनबुडाचे आरोप करत निघाले.’