आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्वय नसल्याने बाळे-हत्तूर बायपासचे रखडले भूसंपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. सोलापूर ते हैदराबाद चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ झाला आहे. सोलापूर- विजापूर चौपदरीकरणास मंजुरी मिळाली आहे. या मागार्वरील बाळे- हत्तूर मार्गावरील भूसंपादनास चार गावांतील शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने प्रक्रिया रखडल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरणाचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे या मार्गावरील बायपासबाबत रेखांकनच नसल्याचे जिल्हा भूसंपादन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन यंत्रणेत असलेल्या समन्वयाअभावी भूसंपादन मात्र रखडले आहे.
असा बायपास अशी अडचण
सोलापूर ते विजापूर हा ११० किलोमीटरचा महामार्ग चौपदरीकरण होणार आहे. त्यास केंद्रीय वन्यजीव बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. याअंतर्गत बाळे, शिवाजीनगर, बसवेश्वरनगर, बेलाटी, कवठे, डोणगाव, भाटेवाडी, नंदूर, शमशापूर, हत्तूर या गावातून २२ किमीचा बायपास जाणार आहे. सध्या तेरा मैल, मंद्रूप, कामती, कुरूल, मोहोळ असा पन्नास किलोमीटरचा स्वघोषित बायपास सुरू आहे. रस्त्यावरील वळण आणि खराब रस्ता यामुळे या पन्नास किलोमीटरच्या रस्त्याचा प्रवास करण्यासाठी किमान सव्वा ते दीड तास लागत आहे. कवठे, बेलाटी, डोणगाव, भाटेवाडी या चार गावातील भूसंपादन प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही. कोंडी येथे जेवढा जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे तेवढाच मोबदला द्यावा. म्हणून शेतकरी विरोध करत असल्याने पुढील प्रक्रिया रखडल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. तर जिल्हा भूसंपादन कार्यालयाकडून बायपासच्या जागेबाबत अद्याप नोटीिफकेशन नाही. जागा अद्याप निश्चित नसताना विरोध कसा, असे त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही यंत्रणेत समन्वय नसल्याने बायपासची प्रक्रिया रखडली आहे.
बोरामणी-हत्तूर या बायपास रस्त्याच्या प्रस्तावही प्रलंबित
हैदराबाद- विजापूर हा बायपास रस्ता होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण या भागातून येणाऱ्या जडवाहतुकीची संख्या जास्त आहे. बोरामणी, कुंभारी, होटगी, हत्तूर असा २६ किलोमीटरपर्यंतचा बायपास करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. अद्याप या प्रस्तावावर काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. हैदराबाद रस्त्यापासून ते विजापूर रस्ता, विजापूर रस्ता ते पुणे रस्ता, पुणे रस्ता ते हैदराबाद रस्ता असा बायपास झाल्यास शहरात एकही जडवाहतूक दिसणार नाही. जडवाहतुकदारांचा वाहतुकीसाठी वेळही कमी लागणार असून वाहनांच्या दुरुस्तीवरील खर्चही कमी होणार आहे.
शेतकऱ्याचा भूसंपादनास विरोध
सोलापूर- विजापूर या महामार्गाअंतर्गत बाळे ते हत्तूरपर्यंत २२ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याला वन्यजीव विभागाची नुकतीच मंजुरी मिळाली. पण चार गावांतील शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध आहे. याबाबत निश्चित मार्ग काढून २०१६ पर्यंत काम मार्गी लावणार.”
बी. बी. इखे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
अद्याप जागा निश्चित नाही
बाळे ते हत्तूर या बायपास रस्त्याकरिता कुठल्या गटातून किती क्षेत्र जागा घेणार आहेत ते अजून निश्चित झाले नाही. हे निश्चित झाल्यानंतर नोटीस देण्यात येतील. यानंतर शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली जातील, रेडी रेकनर दर काढले जातील. शेतकऱ्यांशी चर्चा करून नंतर दर निश्चित केले जातील.” एम. बी. बोरकर, उपजिल्हािधकारी
सोलापूर-विजापूर चौपदरीकरण
- अंतर ११० किलोमीटर, मोठे पूल ६, लहान पूल ३४, उड्डाणपूल ५, रेल्वे उड्डाणपूल २, वाहनासाठी खालून जाणारा रस्ता १०, पादचारी खालून जाणारा रस्ता ११, सेवा रस्ते ६.५४ किलोमीटर, प्रवासी बस थांबे २४, ट्रकसाठी थांबे २ रस्त्याच्या दोन्ही बाजूला, कामाचा कालावधी ३० महिने. रस्ता पूर्ण झाल्यानंतर सोलापूर ते बेंगलोर रस्ता आरामदायी होणार आहे.
सोलापूर-हैदराबाद चौपदरीकरण
- अंतर १०० किलोमीटर, मोठे पूल ५, छोटे पूल २८, वाहनासाठी खालून जाणारे रस्ते ६, पादचारी खालून जाणारे रस्ते २, सेवा रस्ते ४६ किलोमीटर, प्रवासी बस थांबे ३६, ट्रकसाठी थांबे २४ ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने, कामाचा कालावधी ३० महिने.