आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक ऑफ महाराष्ट्र देणार कोटीचे विनातारण कर्ज, विभागीय अधिकारी रमणा यांनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ज्यांनी लघुउद्योगातील उत्पादनांचे विशेष प्रशिक्षण घेतले, बाजारपेठेची माहिती घेतली, त्याबाबतची कौशल्ये आत्मसात केली. परंतु प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी भांडवल नाही, तारण नाही, अशांसाठी बँकांनी विनातारण एक कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण केंद्राने जाहीर केले. त्याला बँक ऑफ महाराष्ट्रने सोलापुरात प्रतिसाद दिला. त्यासाठी स्वतंत्र कक्षच स्थापन केल्याची माहिती बँकेचे विभागीय अधिकारी जी. एन. रमणा यांनी येथील कारखानदारांनी दिली. जिल्हा यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्राने कार्यशाळेत योजनांची माहिती दिली.

पॉवर प्रेझेंटेशनमार्फत विद्या देशमुख यांनी योजना सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मेक इन इंडिया' तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मेक इन महाराष्ट्र'ची घोषणा केली. त्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. लहान उद्योग घटकांना सुलभ अर्थपुरवठा होण्यासाठी बँकांना विशेष सूचना केल्या. कौशल्यप्राप्त नवद्योजकांना एक कोटी कर्ज विनातारण देण्याची सूचना केली. त्यानुसार महाराष्ट्र बँकेने "सीपीसी' (कमर्शियल प्रोसेस सेल) विभाग सुरू केले. त्याच्या माध्यमातून कर्जप्रकरणे गतिमान करण्यात येतात. विभागीय कार्यालयातच असा विभाग कार्यरत झाला. त्याचा कारखानदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यराम म्याकल, अंबादास बिंगी, नरसय्या वडनाल, चंद्रय्या ईराबत्ती आदी उपस्थित होते. वरिष्ठ व्यवस्थापक सचिन धर्म यांनी सूत्रसंचालन केले. गौतम रिकीबे यांनी आभार मानले.

अशी नोंदवा तक्रार-
कर्ज प्रकरणात टाळाटाळ होत असेल. अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार असेल तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रत्येक शाखेतील नोटीस बोर्डवर एक संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्यावर मेसेज पाठवा. त्या तक्रारीचे लगेच निवारण होईल.