आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील बँका फोडणारे दोघे जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या वर्षभरात सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील बँकांच्या तिजोर्‍या गॅसकटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपये पळवणार्‍या टोळीतील दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (12 जुलै) रात्री 10 च्या सुमारास सोलापूर-तुळजापूर रोडवरील हॉटेल अशोका गार्डनमध्ये अटक केली. मारुती उर्फ बिंटू शिवाजी सरडे (वय 25, रा. कन्हेरगाव, ता. माढा), सागर माणिक पोळ (वय 19, रा. जेऊर, ता. करमाळा) अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
बोरगाव (ता. माळशिरस), परिते (ता. माढा) येथील जिल्हा बँकेच्या शाखा, गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, इटकूर (ता. कळंब, जि. उस्मानाबाद), वालवड (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील जिल्हा बँकेच्या शाखा, वालचंदनगर (पुणे) येथील मोबाइल दुकान, निमसाखर (वालचंदनगर) येथील जिल्हा बँकेची शाखा, अनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) येथील सराफा दुकान या टोळीने फोडले होते.
जिल्हा बँकेच्या माळशिरस शाखेतून 10 लाख 26 हजार, माढा शाखेतून 2 लाख 85 हजार, वैनगंगा बँकेतून 13 लाख 42 हजार, जिल्हा बँकेच्या कळंब शाखेतून 1 लाख 8 हजार, इटकूर शाखेतून 3 लाख 27 हजार, लोहारा येथील बँकेतून 10 लाख, वालवड येथील बँकेतून 4 लाख 89 हजार रुपये, अनाळा येथील सराफा दुकानातून 4 लाख 92 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, पुणे येथील मोबाइल शॉपीतून 73 हजार रुपयांचे 150 मोबाइल असा एकूण 42 लाख 51 हजार 976 रुपये रोख, 5 लाख 65 हजार रुपयांचे दागिने व मोबाइल या टोळीने पळवले होते. या टोळीने कर्नाटकमधून 3 इंडिका व्हिस्टा कार, अहमदनगरमधून 1 ट्रॅक्टर पळवला होता. चोरीच्या पैशांतून 35 लाखांचा 1 जेसीबी, 8 लाखांची स्कॉर्पिओ गाडी, 1 दुचाकीची खरेदी केली. बँका, दुकाने फोडण्यासाठी त्यांनी चोरीच्या वाहनांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. हे दोघे आरोपी हॉटेल अशोका गार्डनमध्ये जेवणासाठी आल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांकडून मिळाली होती.
ग्रामीण भागातील बँकांना केले लक्ष्य - ग्रामीण भागातील बँकांना लक्ष्य केले होते. सीसीटीव्ही कॅमेरे, सायरन, सुरक्षारक्षक नसलेल्या, खिडक्या व दरवाजे खिळखिळे असणारी बँक निवडली जायची. बँकेची तिजोरी साधी आणि परिसर रात्री निर्मनुष्य असेल, अशाच बँकांतील तिजोर्‍या फोडण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात 4, अहमदनगरमध्ये 2, उस्मानाबादमध्ये 5, पुण्यात 2 आणि बीड जिल्ह्यात 1 चोरी करण्यात आली. सर्व चोर्‍यांसाठी एलपीजी गॅस व ऑक्सिजन सिलिंडर, गॅस कटर, वायर कटर आणि कटावणी यांचा वापर केला जायचा. या टोळीने फोडलेल्या कोणत्याही बँकेत चोरीविरोधी अत्याधुनिक यंत्रणाच नव्हती. क्लोज सर्कीट कॅमेरे (सीसीसी) नसल्यानेही त्यांचा माग लागू शकत नव्हता. तिजोरी फोडण्याचे सफाईदारतंत्र, बँकेची नेमकी व अचूक माहिती मिळविण्याचे कौशल्य यामुळेही त्यांना अनेक बँका फोडण्यात यश मिळाले आहे. तसेच पोलिसांच्या जाळ्यात यायला उशीरही झाला.
दोघे अटक, तिघे फरार - या टोळीतील मारुती ऊर्फ बिंटू शिवाजी सरडे आणि सागर माणिक पौळ या दोघांना अटक करण्यात आली आहे. टोळीच्या मुख्य सूत्नधारासह असे तिघे फरार झाले आहेत. मारुती सरडे हा दहावी उत्तीर्ण असून, त्याच्या घरची परिस्थिती उत्तम आहे.
असा रचला जायचा कट - बँके पाहणी या टोळीतील दोघे करायचे. बँकेतील विविध व्यवहारांबाबत कर्मचार्‍यांकडे चौकशी करत ते बँकेची रचना समजून घ्यायचे. त्याच रात्नी तिजोरी फोडली जायची.
50 लाखापेक्षा जास्त रकमेची चोरी - सोलापूर, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील 14 बँकां फोडून, सराफाचे दुकान, मोबाईल दुकान आदी ठिकाणी धाडसी चोर्‍या करत केल्या. रोख रक्कम व ऐवज मिळून 50 लाखापेक्षा जास्त रकमचेची चोरी या टोळीने केली.
यांनी बजावली कामगिरी - पोलिस अधीक्षक राजेश प्रधान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार दोशी, पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, साहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक संजीव झाडे, हवालदार कलीमउल्ला पटेल, सिद्राम धायगुडे, राजेश गोसावी, अजित वरपे, सुनील साळुंखे, बळवंत नारायणकर, अनिल गायकवाड, नारायण गोलेकर, फैयाज बागवान, कैलास राऊत, गंगुबाई कवचाळे व चालक नेताजी जगताप.
बँकांनी आरबीआयचे नियम पाळावेत - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुरक्षेबद्दल घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याने चोर्‍या होतात. तिजोरीच्या भिंतीची जाडी, तिजोरी कशी असावी याचे नियम आहेत. सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे. सुरक्षाव्यवस्था कमकुवत असणार्‍या बँकांमध्येच तिजोर्‍या फोडण्याचा प्रकार होण्याची जास्त शक्यता आहे. - राजेश प्रधान, पोलिस अधीक्षक,