आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांचा संप : शहरात 200 कोटींची उलाढाल होणार ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राष्ट्रीयीकृत बँका तीन दिवस बंद असल्याने ‘क्लिअरिंग हाऊस’ही बंद असणार आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांतील धनादेश पारित झाले तरी ते पडूनच असतील. त्यामुळे तीन दिवसांत साधारण 200 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी शिवजयंतीच्या सुटीनंतर दोन दिवसांच्या देशव्यापी संपात राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचारी सहभागी होत आहेत. त्यामुळे तीन दिवस बँका बंद असतील. नागरी सहकारी बँक कर्मचारी ‘बंद’ला पाठिंबा देऊन कामकाज करणार आहेत. सहकारी बँका सुरू असल्या तरी धनादेश वटण्याची कामे होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांची अडचण होणार आहे. एटीएम केंद्रांवर ताणही पडण्याची शक्यता आहे. तो कमी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सायंकाळी सातपर्यंत बँकेच्या सर्व शाखा सुरू ठेवल्या होत्या.

केंद्राच्या आणि कामगारविषयक धोरणांना विरोध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी एक होऊन 48 तासांच्या देशव्यापी ‘बंद’ची हाक दिली आहे. त्याला संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांनी प्रतिसाद दिला. हा प्रश्न केवळ याच कामगारांचा नसून सरकारी कर्मचार्‍यांचाही आहे, असा नारा देत सरकारी कर्मचारी संघटनाही मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनेही त्याला पाठिंबा देऊन सक्रीय सहभाग नोंदवण्याचे ठरवले. सहकारी बँक कर्मचार्‍यांच्या संघटनेने मात्र कायद्याची अडचण सांगून, प्रत्यक्ष सहभाग घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु संघटनेचे प्रतिनिधी दोन दिवसांच्या आंदोलनात सहभागी होतील, असे भारतीय मजदूर संघाचे सचिव अँड. अजित कुलकर्णी म्हणाले.

ग्राहकांसाठी उपाय केले
एकूणच तीन दिवसांच्या बंदमुळे ग्राहकांची गैरसोय होईल म्हणून सोमवारी दोन तासांची जादा सेवा दिली. एटीएममध्येही पुरेसे पैसे भरण्याची सूचना केली. त्यामुळे ग्राहकांना जादा अडचणी येणार नाहीत.’’ एम. ए. वझे, मुख्य व्यवस्थापक

कायद्याची अडचण
सहकारी बँक कर्मचारी संपात सहभागी होण्याबाबत कायद्याची अडचण आहे. त्यामुळे बंदला पाठिंबा देऊन कर्मचारी कामकाज करतील. संघटनेचे प्रतिनिधी मात्र आंदोलनात सहभागी होणार आहेत.’’ अँड. अजित कुलकर्णी, सचिव भा. म. सं.

उद्या निदर्शने करणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू नये, कर्मचार्‍यांच्या वेतनविषयक द्विपक्षीय कराराच्या वाटाघाटी त्वरित सुरू कराव्यात, या मागण्यांसाठी बुधवारी बाळीवेस शाखेसमोर निदर्शने करणार आहोत.’’ गजानन मेहेंदळे, निमंत्रक युनायटेड फोरम