आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या मंत्रिमंडळात बदल करण्यात आला. त्यात सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या ऐवजी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. संघटन कौशल्य आणि जनसंपर्क आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व, हजरजबाबी अन् सर्वसमावेशक अशी ख्याती असलेल्या दिलीप सोपल यांच्या निवडीने राष्ट्रवादी पक्षात समाधान व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी पक्ष वाढेल-दिलीप कोल्हे, मनपा राष्ट्रवादी गटनेता
आमदार दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने राष्ट्रÞवादी वाढण्यास मदत होईल. सोपल यांच्या अनुभवाचा फायदा संघटन वाढीसाठी होणार आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे कार्यकर्ते उत्साहाने काम करतील. ढोबळे यांच्याबाबतीत घेतलेला निर्णय पक्षाचा आहे.
उशिरा न्याय मिळाला-मनोहर सपाटे, नगरसेवक
सोपल यांच्यावर शरद पवार यांचा विश्वास आहे. आमदार दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला. दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून येऊन त्यांनी शरद पवारांना साथ दिली. त्यांना उशिरा मिळालेले फळ आहे.
जनसंपर्क असलेला नेता- पद्माकर काळे, नगरसेवक
आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. चांगला जनसंपर्क असलेला नेता असून, त्यामुळे पक्षास फायदा होईल. पक्ष वाढीसाठी मदत होणार आहे. त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा पक्षास आणि कार्यकर्त्यांना होणार आहे.
दिशा देणारा नेता- प्रवीण डोंगरे, सभापती स्थापत्य समिती
आमदार दिलीप सोपल यांच्या रूपाने सोलापुरास राष्ट्रवादीचे मंत्रिपद मिळाले. त्यामुळे पक्ष वाढेल आणि दिशा देणारा नेता असल्याने कार्यकर्त्यांना आणि पक्षास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होईल.
पक्षबांधणीची मोठी जबाबदारी- डॉ. निशिगंधा माळी, अध्यक्षा, जिल्हा परिषद
अत्यंत हुशार, हजरजबाबी अन् सर्वसमावेशक अशी ख्याती असलेल्या आमदार दिलीप सोपल यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने सोलापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. हसत-खेळत काम करण्याची त्यांची वृत्ती व प्रशासकीय कामांवरील पकड चांगली आहे. ग्रामीण विकासासाठी असलेल्या जिल्हा परिषदेतील अनेक प्रलंबित कामे, नवीन योजनांसाठी निधी मिळवण्यात नवीन कॅबिनेट मंत्री सोपल यांच्यामुळे यश येईल. माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा राज्यभरात चांगला जनसंपर्क आहे. उत्कृष्ट वक्ते अशी त्यांची ख्याती असल्याने आगामी निवडणुकीसाठी पक्षबांधणी करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
काम करण्याची हातोटी-मकरंद निंबाळकर राष्ट्रवादीचे पक्षनेते
पवार कुटुंबीयांवर असलेली निष्ठा, सर्वांना सामावून घेऊन काम करण्याची हातोटी दिलीप सोपल यांच्याकडे असल्याने पक्षनेतृत्वाने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. त्यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याबरोबर पक्षाची मजबूत बांधणी करतील. लक्ष्मण ढोबळे यांच्यावर श्रेष्ठींनी पक्षवाढीची जबाबदारी दिली असून, राज्यात ते चांगले काम करतील, अशी आशा राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांना आहे.
जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावतील- सुधाकर परिचारक, माजी आमदार, पंढरपूर
अॅड. दिलीप सोपल हे एस. काँग्रेसपासून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. विधानसभेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. यापूर्वीही त्यांनी राज्यमंत्री असताना चांगले काम केले होते. या वेळी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाली आहे. निश्चितच ते या संधीचे सोने करतील. सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्न नक्कीच मार्गी लावतील.
विकासाला फायदा-भारत भालके, आमदार, पंढरपूर-मंगळवेढा
विधानसभेच्या कामकाजाचा बराच अनुभव असलेल्या आमदार दिलीप सोपल यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली, ही जिल्ह्याच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. या पूर्वीही सोपल यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन विविध प्रश्न निश्चितच मार्गी लावतील आणि जिल्ह्याला प्रगतिपथावर नेतील, हा विश्वास आहे.
जिल्ह्याचे प्रश्न सुटतील- राजन पाटील, माजी आमदार, मोहोळ
आमदार दिलीप सोपल यांना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठेमुळे मंत्रिपद मिळाले आहे. आमदार सोपल यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्न निश्चित सुटतील. कर्तृत्ववान व काम करण्याच्या वेगळ्या शैलीमुळे ते संधीचे सोने करतील, हा विश्वास वाटतो.
सोपल यांच्यामुळे आनंद- हनुमंत डोळस, आमदार, माळशिरस
दिलीप सोपल हे आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. तसेच जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यास त्यांची मदत होईल.
योजना मार्गी लागतील- बबनराव शिंदे, आमदार, माढा
बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे माझे जुने सहकारी आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने ते सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करतील. त्यांना ग्रामीण पाणीपुरवठा खाते मिळाले आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या योजना ते मार्गी लावतील.
विकासाला गती येईल- दिलीप माने, आमदार, सोलापूर दक्षिण
जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रिपदी दिलीप सोपल यांची वर्णी लागली. त्यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक आहे. त्यांना जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला गती येईल. शिवाय विकासकामांमध्ये ते व्यक्तिगत लक्ष घालतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळाले असले तरी ते अपक्ष आमदार आहेत. मी अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. याचा मला आनंद आहे. सोपल यांच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती येईल.
पक्षवाढीसाठी मदत होईल- श्यामल बागल, करमाळा
आमदार दिलीप सोपल यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यास मदत होईल. त्यांची माजी मंत्री कै. दिगंबर बागल यांच्याशी मैत्री होती. त्यांनी करमाळ्याच्या विकासासाठी कै. बागल यांना साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या निवडीने आनंद झाला आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळणार आहे. त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. सोपल यांच्या नेतृत्वगुणांमुळे आगामी निवडणुकीत पक्ष बांधणीच्या कामात फायदा होईल अशी आशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.