आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या नव्या डावानंतरही ‘पेच’ कायम राहणार !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यातील राष्ट्रवादींतर्गत संघर्ष शमवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवारांनी दिलीप सोपल यांना मंत्रिपद देऊन नवा डाव टाकला आहे. मात्र, आगामी निवडणूक जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याच्या अस्तित्वाची असल्याने पक्षांतर्गत संघर्षाचा पेच कायम राहणार आहे. ढोबळेंच्या कारकिर्दीत पालकमंत्रिपदाची रया गेली, सोपलांच्या निमित्ताने त्यामध्ये ‘जान’ येण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन वर्षांत राष्ट्रवादीच्या पटलावर जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली, विजयसिंह मोहिते-पाटील आणि आमदार बबनराव शिंदे यांची नावे आघाडीवर होती. या दोघांपैकी एकाला मंत्रिपद दिले असते तर राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी तीव्र झाला असता हे उघड आहे. त्यामुळेच पवारांनी यापूर्वी आमदार शिंदे यांच्याऐवजी लक्ष्मणराव ढोबळे यांना मंत्रिपद दिले होते. आताही दोघांमध्ये समतोल ठेवणारी व्यक्ती म्हणून दिलीप सोपल यांची निवड झाली आहे. शिवाय मोहिते-पाटलांना दूर ठेऊन पवारांनी आगामी काळातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सोपल हे वकील आहेत. त्यामुळे त्यांना कोणासोबत कसे राजकीय संबंध ठेवायचे याचे चांगले ज्ञान आहे. लक्ष्मणराव ढोबळे ‘कोठे’ काय बोलतील याचा पत्ता नसतो, मात्र सोपल टायमिंग साधण्यात तरबेज आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांबरोबर सोपल यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीत संघर्षाची स्थिती उद्भवली तर ते ढोबळेंप्रमाणे वेळकाढूपणा न करता तत्काळ सुवर्णमध्ये साधतील, असा पक्षश्रेष्ठींना विश्वास असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीतला संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. हा संघर्ष शमवण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्व राष्ट्रवादीकडे नाही. या संघर्षाचा शेवट काय होईल? याचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही. मोहिते-पाटील यांनी पुन्हा माढा लोकसभा आणि विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा मुद्दा धरून ते जिल्ह्यात अनेक ठिकाणी अभियान राबवत आहेत. आमदार शिंदे गटाने विरोधाची धार कमी केलेली नाही. त्यांनी मोहिते-पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील अनेकांना सोबत घेतले आहे. पंढरपूर-मंगळवेढ्यातून प्रशांत परिचारक तयारी करत असताना राष्ट्रवादीचे काही नेते आमदार भारत भालकेंना पक्षात खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. करमाळ्यामध्ये बागल गटामध्ये संघर्ष सुरू आहे. ढोबळे यांच्या कार्यपध्दतीमुळेच मोहोळ मतदार संघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या सर्वच बालेकिल्ल्यातले नेते आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. ते आपला मतदार संघ इतर नेत्यास देण्यास राजी होणार नाहीत. त्याचबरोबर ते आता पक्षप्रमुखाचे ऐकतील, अशी स्थिती नाही.

पेच का?
सोपल मंत्री म्हणून चांगले काम करतील, पालकमंत्रिपद दिले तर त्यात ‘जान’ आणतील, मात्र राष्ट्रवादीतील संघर्षामध्ये फारसा भाग घेणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात आहे तशीच स्थिती राहील.

सोपलच का?
मंत्री म्हणून कामाचा अनुभव. पवारांचे विश्वासू आहेतच, शिवाय माढ्याच्या शिंदे बंधूंबरोबर त्यांचे चांगले जमते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर त्यांनी मोहिते-पाटील विरोधाची धार कमी केली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील आणि शिंदे या दोघांनाही सोपल आपलेच वाटतात. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. आगामी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत मोठी मदत होण्याची अपेक्षा. जिल्ह्यातील संघर्षावर सुवर्णमध्य काढण्यास मदत होईल.

ढोबळे यांना का वगळले?
प्रा. ढोबळे उत्तम वक्ते आहेत, मात्र राष्ट्रवादीला चांगल्या संघटकाची गरज आहे. मंत्री म्हणूनही त्यांना आपल्या कामाचे मार्केटिंग करता आले नाही. मोहिते-पाटील आणि त्यांचे विरोधक या दोन्ही गटांत समन्वय ठेवण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा सर्वांनी त्यांच्याविषयी तक्रारी केल्या. अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्यावर शेरेबाजी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल आदर राहिला नाही. आम्हाला चांगला पालकमंत्री हवा, असे सर्वच नेते बोलत होते. याची दखल श्रेष्ठींनी घेतली असावी.