आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअर शॉपीच बनले बार; रहिवाशांना त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अक्कलकोट रोडवरून यल्लालिंग मठाला जाण्याच्या मार्गावर उजव्या बाजूस एक बिअर शॉपी आहे. या बिअर शॉपीने सध्या बारचे स्वरूप घेतले आहे. वाढत्या त्रासाला कंटाळून येथील रहिवाशांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. पण त्यांची तक्रारच घेण्यात आली नाही. अखेर येथील रहिवाशांनी पोलिस आयुक्तांचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्कलकोट रस्त्यावरील कर्णिक नगर, पद्म नगर, एकता नगर हा सुशिक्षित परिसर म्हणून ओळखला जातो. येथील रहिवाशांना अक्कलकोट रस्त्यावर यायचे असेल तर दोन रस्ते आहेत. त्यापैकी एक रस्ता हा यल्लालिंग मठाजवळून जातो. या रस्त्यावर एक बिअर शॉपी आहे. बिअर शॉपीमध्ये बिअर विकण्याची परवानगी असते. मात्र येथे खुलेआम मद्यपान सुरू असते. त्यामुळे या शॉपीला बिअरबारचे स्वरूप आले आहे. यामुळे रस्त्यावर वाहने लावणे, दारू जास्त झाली की रस्त्यावर धिंगाणा घालणे, रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍यांना शिवीगाळ करणे, छेडछाड करणे आदी प्रकार दररोज घडत आहेत. या प्रकारामुळे वैतागलेले येथील नागरिक एकत्र येऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेले. मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. आता नागरिक पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे
बिअर शॉपीपासून काही फुटांच्या अंतरावर एमआयडीसी पोलिस ठाणे आहे. पोलिसांच्या नजरेलाही हा प्रकार दिसतो. तरीही पोलिस कारवाई करत नाही. तसेच याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने प्रश्नांचा उलघडा होत नाही.

.. अन्यथा आंदोलन
दारूड्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून त्रास आहे. गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो होतो. परंतु तक्रार घेतली नाही. आता पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. समस्या न सुटल्यास आंदोलन करणार. योगेश बसरगी, बसव युवा मंच अध्यक्ष

महिलांना त्रास होतो
बिअर शॉपमध्ये बार चालवला जातो. त्याचा त्रास परिसरातील महिलांना सोसावा लागत आहे. शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. याबाबत सर्व संघटना मिळून आवाज उठवणार आहे. न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावर येऊ. सुशील नाटकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती अध्यक्ष