आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातातीत जखमी काळविटाचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठासमोर सोमवारी अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या त्या काळविटाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्या हरणावर महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात उपचार सुरू होते.
सोमवारी सकाळी विद्यापीठसमोरील राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असणा-या काळविटाच्या पाठीमागील बाजूस जोरदार धडक बसली. काळवीट थेट महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकले. घटनास्थळी निपचीत पडलेल्या काळविटाच्या मदतीसाठी विद्यापीठमधील प्राध्यापकांनी पुढाकार घेतला. कुलसचिव कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांनी टाटा सुमोतून त्याला उपचारासाठी हैदराबाद रस्त्यावरील पशुवैद्यकीय केंद्रात पाठविले. तेथील उपचारानंतर जखमी काळविटाला महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. विजापूर रस्त्यावरील सिद्धेश्वर वनविहारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाकडून जखमी काळविटाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न झाले.
मार्गावर सूचना फलकांची गरज
महामार्गांसह राज्यमार्गाच्या परिसरात वन्यजीवांचा वावर असतो. पण, त्याबाबतचे सूचना फलक नसल्यामुळे चालकांना त्याची माहिती नसते. स्वयंसेवी संस्था, संघटना वाढदिवस किंवा इतर कारणांसाठी शुभेच्छांचे मोठे डिजिटल फलक उभे करून शहर व परिसर विद्रूप करतात. त्याऐवजी सावधान सूचकतेचे फलक लावावेत.
वन्यजीव जखमी झाल्यास
>त्वरित वनविभागाच्या 155314 या टोल फ्री क्रमांकवर माहिती द्या
> जखमी प्राण्याच्या भोवती गर्दी, गोंधळ करू नका. त्यामुळे तो जास्त घाबरतो
> जखमेवर रॉकेल किंवा इतर तत्सम पदार्थ टाकू नका, फारच आवश्यकता वाटल्यास थोडीफार हळद टाका.
> जखमी प्राण्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नका, उपचारासाठी हलविण्यापूर्वी त्याचे डोळे बंद करा
> डोळे बंद केल्याने मानवी हालचाली दिसत नसल्यामुळे ताण वाढत नाही.