आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक उपाय: रात्री बाराच्या आत हॉटेल, दुकाने बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. घरफोडी, चोऱ्या, गुन्हेगारी यावर अंकुश ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा ते सकाळी सहापर्यंत रस्त्यावर कुणी संशयितरीत्या फिरत असल्यास पोलिस चौकशी करतील. बाराच्या आत हॉटेल, दुकाने बंद करण्याच्या सूचना सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निरीक्षकांना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत.
विजापूर रस्ता, होटगी रस्ता, पुणे रस्ता, तुळजापूर, हैदराबाद रस्ता, मंगळवेढा रस्ता, रेल्वे स्टेशन, बसस्थानक या भागात चौकशीसाठी पथकेही नेमण्यात आली आहेत. मध्यरात्रीच्या सुमाराला काही तरुण धूम स्टाइलने दुचाकी चालवतात. अनेक हॉटेल, पान दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू असतात. बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात हे चित्र पाहण्यास मिळते. त्यावर अंकुश येणार आहे.
जेलरोड हद्दीत मटका घेताना झाली कारवाई
मागील पंधरवड्यात मुळेगाव तांड्यावरील सर्व हातभट्या नष्ट करण्यात आल्या होत्या. तरीही शहरात काही ठिकाणी हातभट्टी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सर्व पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक यांनी कारवाई केली. सुमारे आठशे ते एक हजार लिटर दारू जप्त करून जागेवरच नष्ट केली. हातभट्टी दारूमुक्त शहर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेलरोडच्या हद्दीत मटका घेतानाही काहींवर कारवाई झाल्याची माहिती आहे.
अंडा ऑम्लेट, सोडा गाड्यांवर मद्यास मुभा
अंडा ऑम्लेट, सोडा गाड्यांवर मद्य पिण्यास मुभा दिली जाते. काहीजण फूटपाथवर बसून मद्यपान करतात. शहरातील सर्वच महत्त्वाच्या चौकात हा प्रकार पाहण्यास मिळतो. महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागतो. काही चायनीज गाड्यांवर हा प्रकार आढळून येतो. बिअर शॉपीमध्ये फक्त विक्रीची परवानगी असताना काही दुकानांत मद्य पिण्यास मुभा देतात. हा प्रकार बंद करण्याची मागणी अनेक नागरिकांनी नाव छापण्याच्या अटीवर केली आहे. सोडा गाडी, चायनीज गाड्यांवरचा हा प्रकार बंद व्हावा अशी मागणी आहे.
गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न
- मध्यरात्री बारा ते सकाळी सहापर्यंत संशयिताची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काम सुरूही झाले आहे. मध्यरात्री बारापर्यंत हॉटेल सुरू राहतील. काही हॉटेलांना वेगळी परवानगी आहे. हातभट्टी दारूवर आम्ही आज कारवाई केली आहे. हातगाड्यांवर दारू पिण्यास कुणी मुभा देत असल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल.''
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...