आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती महोत्सवात नृत्याविष्कारातून प्राचीन सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - केंद्रसरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संचालनालयाच्या वतीने येथे आयोजित भक्ती महोत्सवात शहरवासीयांना देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील प्राचीन सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडले. यात महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि गोवा राज्यातील कलाकारांच्या नृत्याविष्कारातून साकारलेली लोककला रसिकांना पाहावयास मिळाली.

पंढरपूर अर्बन बँकेच्या सहयोगाने येथील टिळक स्मारक मंदिराच्या मैदानावर याचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद््घाटन चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माधव महाराज नामदास होते. या वेळी सांस्कृतिक केंद्र संचनालयाचे सचिव पंकज नागर म्हणाले, कलाकार हे फक्त प्रेक्षकांच्या टाळ्यांचे भुकेले असतात. पंढरपूरकर रसिकांनी या कलाकारांना योग्य दाद द्यावी. या वेळी बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शहरवासीयांना केले. बालकलाकारांच्या भरतनाट्याच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली.

या कार्यक्रमास माजी आमदार सुधाकर परिचारक, वा.ना.उत्पात, बाळासाहेब देहूकर, मुन्नागीर गोसावी, कार्यकारी अधिकारी लक्ष्मण डिंगरे, सरव्यवस्थापक उमेश विरधे यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.

राज्यांतील लोककला
राजस्थानचेविष्णू शर्मा सहकलाकारांनी सर्वांगावर तेरा प्रकारची वाद्ये लावून ती वाजवण्याचा तोराताली हा प्रकार सादर केला. तसेच रास गरबा, रितून वर्मा यांचे द्रौपदी वस्रहरण, गोव्याचे महेंद्र तावकर कलाकारांचा डोक्यावर जळती समई घेऊन नृत्य, राजस्थानचे मयूर नृत्य सादर झाले.

भक्ती महोत्सवामध्ये सहभागी नृत्यांगणांनी डोक्यावर समई घेऊन समूहनृत्य सादर केले. लोककलेच्या अनोख्या नृत्याविष्काराने पंढरपुरातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

पंढरपूर अर्बन बँक आणि केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय भक्ती महोत्सवामध्ये नृत्य सादर करताना कलाकार. या समूह लोकनृत्यातील पदन्यासाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. छाया: विलास साळुंखे