आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या उमेदवाराची चणचण, चांगला नेता शोधून ताकद द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा- सर्वनिवडणुका या पक्षाच्या वतीने लढविल्या जातात. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळत नसून ही परिस्थिती बदलण्यासाठी चांगला नेता-कार्यकर्ता शोधून त्याला ताकद दिली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. मंगळवेढा येथे नगर वाचनालयात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य शंकरराव वाघमारे उपस्थित होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष शिवदास चिंचकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अशोक माळी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘आजपर्यंत आपण विरोधी पक्षात होतो. आता सत्तेत असल्यामुळे जनतेची कामे करण्याची आमची आणि तुमची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक कामांपेक्षा सार्वजनिक समाज हिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. याचे पावित्र्य टिकविण्यासाठी अवैध धंदे हद्दपार झाले पाहिजेत. यासंदर्भात आपण पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना सूचना दिल्या आहेत. अवैध धंद्यांची पाठराखण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. महात्मा संत बसवेश्वर यांचे स्मारक झाल्यास इतर राज्यातूनही या ठिकाणी भाविकांचा आेघ वाढेल. त्यामुळे मंगळवेढ्याला नावलौकिक प्राप्त होईल.’

भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, ‘मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वाची ३५ गावांची पाणी पुरवठा योजना तयार असून पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावावी. संत बसवेश्वरांचे स्मारक, शहरातील इतर समस्या, १२६ एकरांवरील सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये श्री. देशमुख यांनी लक्ष घालावे.’ यावेळी दामोदर देशमुख, अशोक माळी, दत्तात्रय यादव, अरविंद माने, बापू मेटकरी, शुभांगी सूर्यवंशी, राजेंद्र सुरवसे, चंद्रशेखर राजमाने, अण्णासाहेब पाटील, सिद्धेश्वर धसाडे, चंद्रकांत जाधव, दरेप्पा दत्तू, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अप्पासाहेब पाटील, नवनाथ देशमुखे, मुन्ना देशमुखे, कैलास मर्दा यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख यांचा निवडणुकीसाठी कानमंत्र
श्री.देशमुख म्हणाले, ‘देशाबरोबर आता आपली राज्यातही सत्ता आहे. भविष्यात येऊ घातलेल्या नगरपालिका, दामाजी सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत, सहकारी संस्था आदी प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सहभागी होऊन सत्ता काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनी तयारीला लागावे.’ असा कानमंत्र दिला.
मंगळवेढा . येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री विजय देशमुख. व्यासपीठावर शशिकांत चव्हाण, शंकरराव वाघमारे, दत्ता जमदाडे, शिवदास चिंचकर, अरविंद माने आदी. कार्यकर्ता मेळाव्यास तालुक्यासह शहरातून प्रतिसाद मिळाला.