आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर झाली अभंगवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुंबईतील सांख्य डान्स अकॅडमी सोलापुरातील नाट्यकेशी अकॅडमी परफॉर्मिंग आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी अभंगरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

महाराष्ट्रातील संत साहित्याच्या माध्यमातून भरतनाट्यम नृत्याचा महाराष्ट्रात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अभंगरंग हा कार्यक्रम झाला. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदी संतांच्या अभंग ओवीच्या सादरीकरणातून मुंबईतील कलावंतांनी तितक्याच ताकदीने भरतनाट्यमचा नृत्याविष्कार सादर केला. अभंगवाणी आणि भरतनाट्यम यांच्या अद्वितीय मिश्रणातून अभंगरंगातून भक्तीचे रंग प्रकटले.

बुधवारी सायंकाळी छत्रपती रंगभवन येथे हा कार्यक्रम पार पडला. आशयघन अशा निवडक अभंगांवर भरतनाट्यमच्या १३ कलावंतांनी भरतनाट्यम सादर केले. "प्रथमा रंगी लंबोदरा, सकळ सिद्धीचा दाता,' "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,' "खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे' आदी अभंग सादर करण्यात आले. तसेच संत तुकारामाचे "आम्ही भाग्याचे भाग्याचे लाेका घरी गाई म्हशी आम्हा घरी उंदीर घुशी' असे नानाविध अभंग सादर करण्यात आले. सुमारे २० हून अधिक अभंग सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन सीमा मुळे यांनी केले. कार्यक्रमाची मूळ संकल्पना राजश्री शिर्के यांची होती तर नृत्य संरचना वैभव आरेकर यांनी केली. या वेळी नाट्यकेशी अकॅडमीचे हृषीकेश पागे उपस्थिती होते.

भरतनाट्यमला आधार महाराष्ट्राच्या संत साहित्याचा
मुंबईतीलसांख्य या डान्स कंपनीचे संस्थापक वैभव आरेकर हे नालंदा विद्यापीठाचे माजी प्राचार्य. भरतनाट्यमचा गाढा अभ्यास. ते देशातील एकमेव भरतनाट्यमचे उच्च दर्जाचे कलाकार असल्याचा दावा आहे. महाराष्ट्रात भरतनाट्यमचा प्रसार होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी संत साहित्याचा आधार घेतला. संतांच्या अभंगातून समाजाचे प्रबोधन होते. तेव्हा हाच धागा पकडत आरेकर यांनी भरतनाट्यमचा प्रसार करण्यासाठी संतांच्या अभंगांसोबतच भरतनाट्यम सादर करण्याचे ठरवले. ते राज्यात विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करत असतात. सोलापुरातील कार्यक्रम हा त्याचाच एक भाग असल्याचे हृषीकेश पागे यांनी सांगितले.

फोटो - सांख्य डान्स अकॅडमी सोलापुरातील नाट्यकेशी आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भरतनाट्यम सादर करताना कलाकार.