आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’च्या ‘भास्कर विचार’ उपक्रमास शहरातील मुख्य मंदिरांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- श्रद्धेला तडा न जाऊ देता दैनिक ‘दिव्य मराठी’ने आयोजिलेल्या श्रावणातील दूध वाचवण्याच्या उपक्रमास शहरातील प्रमुख मंदिरांनी त्वरित आनंदाने संमती दाखवली आहे. यामुळे पहिल्या प्रयत्नातच श्रावणातील सोमवारी अर्पण करण्यात येणार्‍या किमान 600 लिटर दुधाची बचत होईल. शिवाय हे दूध प्रसादरूपाने उपस्थितांना तसेच गरजूंना देण्याचा निर्णय मंदिराच्या पुजार्‍यांनी घेतला. धार्मिक परंपरेत काळानुरूप बदल करण्यास मान्यता देऊन सोलापुरातील प्रमुख मंदिरांनी एक चांगला पायंडा पाडला आहे.
नागपंचमीलाही भाविकांनी घ्यावी अशी काळजी
एक ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आहे. या दिवशीही शहरातील शिवमंदिरातील श्री नागनाथाच्या मूर्तींवर दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. भाविकांनी पूजेसाठी नेलेल्या दुधातील केवळ दोन-तीन थेंब भक्तिभावाने अर्पण करून उर्वरित दूध घरातील मंडळींना प्रसादरूपाने द्यावे.
उपक्रमामागील उद्देश
शास्त्र असे सांगते की, मनोभावे ईश्वरास केलेला प्रणाम आणि नामस्मरण यानेही कृपाप्रसाद प्राप्त होऊ शकतो. देव भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे श्रावण, महाशिवरात्र आणि नागपंचमीदिवशी भाविकांनी शिवलिंगावर केवळ दोन थेंब दूध अर्पण करून उर्वरित दूध घरी नेऊन स्वत: व कुटुंबीयांना प्रसादरूपाने द्यावे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
चळवळीचे रूप येईल
दैनिक ‘दिव्य मराठी’ कायम समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. यापूर्वीही टिळा होळी करून पाण्याचा अपव्यय टाळला होता. भाविकांनी दिलेल्या दुधापैकी केवळ पाच पळीपात्र दूधच शिवलिंगावर अर्पण करावे. राहिलेले दूध उपस्थितांना, गरजूंना किंवा याचकांच्या मुखी घालावे. आम्ही ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात याचा अंमल आधीही करत होतो. आता याला चळवळीचे रूप येईल. आनंद हब्बू, श्रीसिद्धरामेश्वर मंदिर पुजारी
आजपासूनच अंमलबजावणी
प्रस्थापित प्रथेच्या नावाखाली दूध व्यर्थ जाऊ नये हा उद्देश चांगला आहे. श्रद्धा जोपासून समाजोपयोगी बदल घडवण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. यामुळे श्रावण महिन्याची सार्थकता द्विगुणित होईल. भाविकांनी याचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमात हातभार लावून सहकार्य करावे. राजशेखर हिरेहब्बू, श्री मल्लिकार्जुन मंदिर मुख्य पुजारी
धर्माच्या माध्यमातून सुधारणा
धार्मिक बाबींमध्ये सुधारणा करायची असेल तर धर्माला शिव्याशाप देऊन, आघात करून ते कदापि शक्य नाही. धर्माच्या माध्यमातूनच सुधारणा शक्य आहे. धर्माचा सन्मान राखून ‘दिव्य मराठी’कडून सुधारणा घडवण्यात येत आहे, हे चांगले आहे. काळानुरूप बदल स्वीकारणारा धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख आहे. हिंदू धर्माने आजवर अनेक कालबाह्य गोष्टी टाकून देऊन चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. या उपक्रमाला शुभेच्छा. सुधाकर इंगळे महाराज