सोलापूर - आषाढी एकादशीस सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी सबंध महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून वारक-यांचा मेळा श्रीक्षेत्र पंढरीकडे सरसावत असतो. यात सामील माउली आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालख्यांबरोबरच सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय असतो भल्यामोठ्या लव्याजम्यासह गजराणीला घेऊन निघालेली शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा.
दशकाहून अधिक काळ पालखीसमवेत येणा-या चंपाकली हत्तीणीच्या निधनाने यंदा तिची उणीव जाणवत आहे. पण तिच्या जागी पुढीलवर्षी ‘लक्ष्मी’ हत्तीणीचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी आहे.
तीन महिन्यांपूर्वी चंपाकलीचे निधन झाले. तिच्या जागी संस्थानने नव्या नऊ वर्षांच्या हत्तीणीचा समावेश केला आहे. ही हत्तीणही मागील हत्तीणींसारखी गोंडस असून ती सध्या शेगाव येथेच आहे. प्रतिवर्षी सुमारे 450 किलोमीटरचे अंतर कापून चंपाकली पालखीची शोभा वाढवित असे. साधुबुवा नामक माहूत पालखीदरम्यान हत्तीणीचे नियंत्रण करीत असतात. पुढीलवर्षी लक्ष्मी हत्तीण येणार आहे. साधुबुवांबरोबर आणखी एकास माहुताचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- पालखीसोबत एकदा हत्तीचा समावेश करण्यात आला होता. परंतु, तेव्हा अनुचित प्रकार घडला. त्यामुळे पालखीसोबत हत्तीणच ठेवण्यात येते. यंदा एका हत्तीणीस आणले असून पालखीसोबत पाळावयाच्या नियमांचे प्रशिक्षण देणा-या माहुतास बिहार येथेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. तो सध्या तिला प्रशिक्षण देत आहे.’’ माउली शेगावीकर, सेवेकरी
शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात स्वागत
आनंदाचे डोही, आनंद तरंग, भगव्या पतका आमुच्या खांद्यावरी, पोचवू कीर्ती सातासमुद्रापरी अशा अभंगांमध्ये तल्लीन शेकडो वारक-यांसह टाळ मृदंगाच्या गजरात श्री गजानन महाराज पालखीचे मंगळवारी जिल्ह्यात आगमन झाले. सायंकाळी सहा वाजता पालखी उळे, (ता. दक्षिण सोलापूर) येथे दाखल झाली. बुधवारी सकाळी 9 वाजता सोलापूर शहरात पाणी गिरणी चौकात आगमन होणार आहे.
पालखीचे आगमन होण्यापूर्वीपासूनच उळे गावात महिला आणि ग्रामस्थांची स्वागतासाठी लगबग सुरू होती. वेशीपासून पालखीच्या मुक्काम स्थानापर्यंत सडा मारण्यात येऊन रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मराठवाड्यातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश होताच दक्षिणच्या पंचायत समिती सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, उपसभापती अप्पासाहेब धनके, उपसरपंच बालाजी येणेगुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफीक नाईकवाडी, उळ्याच्या सरपंच नर्मदा शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख मकरंद रानडे, नागेश चंदेले यांच्यासह मान्यवरांनी पालखीचे स्वागत व पूजन केले. उळेगाव येथे भक्त, सेवेक-यांसह पालखी दाखल झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाबपुष्पांनी स्वागत करण्यात आले. गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. या पालखीसोबत जवळपास सहाशे वारकरी आहेत. तसेच तीन अश्व, बँडपथक, रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता तुळजापूर रोडवरील पाणीगिरणी चौकात पालखीचे आगमन होणार आहे.
मंगळवारी सूर्य मावळतीला चालला असताना उळे गावच्या सीमेवर श्री गजानन महाराज पालखीचे टिपलेले मनोहारी दृश्य.छाया : अप्पाराव शिमगे