आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bijapur Lok Sabha Constituency, Latest News In Divya Marathi

विजापुरातील राजकारण ‘थंड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-गोलघुमट नगरी अशी ओळख असणार्‍या विजापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस व भाजपमध्ये लढत होत आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, नेत्यांमधील अंतर्गत शीतयुद्धामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत शांतता आहे. अनुसूचित जातीसाठी विजापूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत काँग्रेसने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले होते. यावेळी भाजपचे विद्यमान खासदार रमेश जिगजिणगी व काँग्रेसचे उमेदवार क्रिकेटपटू प्रकाश राठोड या पारंपरिक प्रतीस्पध्र्यांमध्ये पुन्हा लढत होणार आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये प्रकाश राठोड यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा त्यांच्याऐवजी अर्जुन राठोड यांना उमेदवारी देण्याची मागणी काही आमदारांनी पुढे रेटली. त्यावरून पक्षांतर्गत शीतयुद्ध सुरू झाले. त्यामध्ये काही आमदारांचा समावेश होता.चार दिवसांपूर्वी पालकमंत्री एम. बी. पाटील, शरणप्पा सुणगार यांनी एकत्रित बैठक घेऊन मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, उमेदवारी कधी दाखल करायची, याबाबत निर्णय झाला नाही.
त्याचप्रमाणे भाजपमध्येही विधानसभा निवडणुकीत दुखावलेल्या स्थानिक नेतेमंडळींना एकत्रित करण्याची मोहीम जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री एस. के. बेळुब्बी यांनी सुरू केलीय. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा केजीपी पक्ष भाजपत समाविष्ट झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडाफार उत्साह असला तरी नेतेमंडळी सुस्त आहेत. बुधवार (ता. 19) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होतेय. पण, अर्ज कधी भरायचा याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप शांतता आहे. कर्नाटक राज्यात लोकसभेच्या एकूण 28 पैकी 20 जागांवर उमेदवारांची घोषणा काँग्रेस व भाजपने केली. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.