आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचे तांडव: पाऊस, गारपिटीमुळे 65 हजार पक्ष्यांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मागील दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तब्बल 65 हजार स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला. 27 प्रजातींचे पक्षी व नऊ प्रकारच्या सस्तन प्राण्यांचा गारपिटीत मृत्यू झाला. त्याबरोबर अनेक मुकी जनावरे जखमी झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे मानवांच्या नुकसानीची थोडीफार तरी भरपाई शासनाकडून मिळाली, पण वन्यजीवांवर कोसळलेल्या आपत्तीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

बॉम्बे नॅचर हिस्ट्री सोसायटीमध्ये वन्यजीवांवर संशोधन करणारे सोलापूरचे सुजित नरवडे व त्यांच्या सहकार्‍यांनी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या वन्यजीवांच्या नुकसानीची संपूर्ण राज्यभरात फिरून पाहणी केली. त्याबाबतचा स्वतंत्र अहवाल त्यांनी तयार केला. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील 27 ठिकाणच्या प्राणी व पक्ष्यांच्या मृत्यूच्या नोंदी त्यांनी केल्या. त्यामध्ये स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचा त्या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याचे आढळले. प्रामुख्याने मांडवा (जि. वाशीम) येथे दीड हजार पोपट व असंख्य गुलाबी मैना हे पक्षी मृत्युमुखी पडले. मराठवाड्यातील काही माळरानांवर काळवीट, ससे मृत्युमुखी पडले.

घरटीही उद्ध्वस्त
नरवडे यांनी केलेल्या सर्वेक्षणात न ओळखता येणार्‍या दहा हजार पक्ष्यांबरोबर सुमारे 31 हजार गुलाबी मैना, 13 हजार चिमण्या, 3150 पोपट, 960 तितर, 880 गाय बगळ्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी वादळाच्या तडाख्यात झाडे उन्मळून पडल्याने पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली.

या पक्ष्यांचा मृत्यू
युरोप खंडातून भारतात येणार्‍या गुलाबी मैना (रोझी स्टर्लिंग), गायबगळे, पाणकावळा, साळुंकी, पाकोळी, पारवा, कावळा, मोर, कुदळ्या, पांढर्‍या डोक्याचा कुदळ्या, चित्रबलाक, कोतवाल, वेडा राघू, चंडोल, करकोचे, बुलबुल

मुक्या प्राण्यांचा वाली कोण?
दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे वन्यजीव, पक्ष्यांच्या नुकसानीची संख्या मोठी आहे. मानवाच्या नुकसीचा बोलबाला सगळीकडे झाला, पण मुक्या प्राण्यांचे नुकसानीचे सर्वेक्षण आम्ही बीएनएचएसच्या माध्यमातून केले. रस्त्यांवर साचलेला गारांचा खच, प्राणी व पक्ष्यांच्या रक्ताने माखलेली राने असे विदारक चित्र पाहताना अंगावर काटा आला.
- सुजित नरवडे, संशोधक,
बीएनएचएस, मुंबई