आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म-मृत्यूचे अडीच हजार दाखले प्रलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार घेतल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या आशा वाढल्या आहेत. महापालिकेत सर्वसामान्यांची कामे नियमानुसार होत असतील असा विश्वास निर्माण होत असताना महापालिका जन्म-मृत्यू कार्यालयात मात्र जन्म-मृत्यूचे अडीच हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे.

जन्म अथवा मृत्यू नोंद 21 दिवसांत होऊन दाखले दिले पाहिजे असा नियम आहे. पण, मागील 85 दिवसांपासून दाखल्याची नोंदच झालेली नाही. मंगळवारच्या माहितीनुसार जन्म-मृत्यू कार्यालयात 2 डिसेंबरच्या नोंदी होणे आवश्यक असताना ऑक्टोबर महिन्यातील नोंदी सुरू असल्याचे दिसून आले. अशा प्रकारे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना हेलपाटे होत आहेत. याबाबत अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्नात असता मनुष्यबळ नसल्याने नोंदी कमी होत असल्याचे सांगण्यात आले.

ऑनलाइनची संकल्पना
जन्म झाल्यावर प्रसूतिगृहाकडून नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन संकल्पनेची मागणीही आहे. जन्मानंतर प्रसूतिगृहात ऑनलाइन नोंदणी करून जन्म दाखला आणि टोकन नंबर दिला जातो. त्याआधारे महापालिका आरोग्य विभाग प्रमाणपत्रांची फी घेऊन ते प्रमाणित करून द्यावे, अशी संकल्पना आरोग्य विभागाची आहे.

कारणे दाखवा नोटीस बजावली
21 दिवसांत जन्म-मृत्यूची नोंद घेणे आवश्यक आहे. महापालिकेत नोंदी उशिरा होत असल्याने शासनाच्या आरोग्य विभागाकडून पत्र यापूर्वी मनपास आले आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. नोंदणीस गती मिळावी म्हणून दोन अतिरिक्त कर्मचारी त्या विभागास दिले. तेथे काम करणार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.’’ डॉ. प्रसाद कुमार, पालिका आरोग्य अधिकारी

85 दिवसांपासून नाही नोंद
महानगरपालिका जन्म-मृत्यू नोंदणी विभागात 2500 दाखले नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. 21 दिवसांत नोंदणी होणे आवश्यक आहे. ऑक्टोबर महिन्याच्या नोंदी आता घेण्यात येत आहेत. 85 दिवसांपूर्वीचे दाखले नोंदले गेले नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

आरोग्य मंत्र्याचे पत्र
सोलापूर महापालिकेत जन्म-मृत्यूच्या नोंदी संथगतीने होत असल्याने आरोग्य विभागाकडून महापालिकेस पत्र पाठवून जाब विचारण्यात आला आहे. त्यानंतर महापालिकेने नोंदी घेण्यास गती दिली.