आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP 7 Corporators Give Resignation To Maharashtra President

भाजपच्या 7 नगरसेवकांचे प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका विरोधी पक्षनेतेपदी कृष्णाहरी दुस्सा यांची निवड झाल्यानंतर भाजप पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर सत्तेत असताना आमदारांचे गुणगान गायच्या. आता त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे पक्षाविरुद्ध शड्ड ठोकलेल्या 7 नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांकडे हा विषय घेऊन जाण्यासाठी नगरसेवकपदाचे राजीनामापत्र पाठविले आहे.

महापालिका विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस आता चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. महापलिकेने 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. या सभेसाठी घेतलेल्या पार्टी मीटिंगला 7 नगरसेवकांनी अनुपस्थिती दाखवून पक्षविरोधी बावटे फडकविणे सुरू केले होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस यांच्याकडे संबंधितांनी राजीनामे सादर केले असले तरीही पक्षाने तेवढी गंभीरतेने हे प्रकरण घेतलेले नाही. आमदार विजयकुमार देशमुख शुक्रवारी सोलापुरात येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा ते आढावा घेणार आहेत.
पक्षहितासाठी निर्णय
मला पक्ष चालवायचा आहे. पक्ष वाढवण्यासाठी मी कृष्णाहरी दुस्सा यांची निवड केली. पक्ष पातळीवर चर्चा करूनच ही निवड झाली. यामध्ये व्यक्तिगत राजकारण नाही. मी आमदार किंवा पक्ष पदावर असताना पैसे घेतल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप केलेले नाहीत. पक्षांतर्गत आरोप होत असेल तर दु:ख वाटते.’’ आमदार विजयकुमार देशमुख
नगरसेवकांशी चर्चा करणार
मनपा विरोधी पक्षनेता निवडीवरून काही प्रमाणात नगरसेवक नाराज आहेत. त्यांच्याशी शुक्रवारी किंवा शनिवारी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. पक्षात वाद असतो, पण कालांतराने तो मिटत असतो.’’ अविनाश कोळी, जिल्हा संघटनमंत्री, भाजप
प्रदेशाध्यक्षांना विषय कळविला
सोलापुरातील नाराज नगरसेवकांचे मत मी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस यांना कळविले आहे. त्यावर सविस्तर चर्चा झाली नाही. हकीकत त्यांना सांगून त्यातून तोडगा काढण्यात येणार आहे.’’ सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, भाजप
पक्षच निर्णय घेईल
आम्हाला विश्वासात न घेता ही निवड केली. ते करताना आम्हाला अंधारात ठेवले. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. प्रदेशकडे नाराजी कळविली आहे. आम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. त्यांना गरज वाटली तर त्यांनी ते महापालिका आयुक्तांकडे सादर करावेत.’’ पांडुरंग दिड्डी, नगरसेवक
या नगरसेवकांनी दिले आपल्या पदाचे राजीनामे
मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, पांडुरंग दिड्डी, र्शीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, नरेंद्र काळे आणि विजय वड्डेपल्ली यांनी देवेंद्र फडणीस यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा पाठविला आहे.
आमदार देशमुखविरोधी गट सक्रिय

आमदार देशमुख यांच्या विरोधात एक गट मागील महिन्यापासून सक्रिय आहे. नव्याने विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा वाद निर्माण झाल्याने तो गट पुन्हा सक्रिय झाला. मागील आठवड्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भेट घेऊन आलेल्या या गटाने असंतुष्ट आठ नगरसेवकांना सोबत घेऊन मोहीम सक्रिय केलीय. बुधवारी रात्री मजरेवाडी येथील एका संस्थेच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली.