आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Celebrate His Party S Won Issue At Solapur, Divya Marathi

महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी निपटून काढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसद भवनासमोर आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेतली. आपल्या करिश्म्याने भाजपला केंद्रात सत्ता मिळवून देणारे मोदी देशाचा विकास गुजरातप्रमाणे करतील. ‘सबका साथ, सबका विकास’ असा विश्वास मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. त्यानुसार महिला सुरक्षा, वाढती महागाई, बेरोजगारी, परराष्ट्र धोरण या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना शोधून काढाव्यात, अशी अपेक्षा सोलापुरातील भाजपसह प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली.

गरिबांचे सरकार आले
प्रकाश मारता (शहर उत्तर विधानसभा प्रमुख)-मोदी हे सर्वसामान्य परिवारातून पुढे आले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा त्यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मोदी सरकार भरपूर काही करेल. केंद्रात आलेले सरकार गरिबांचे असल्याची भावना प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहेत.

विधानसभेतही भाजपची सत्ता
विजयकुमार देशमुख (आमदार तथा शहराध्यक्ष)-एक चहावाला आज भारताचा पंतप्रधान झाल्यामुळे भारतीय लोकशाहीत सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, असा विश्वास निर्माण झाला आहे. देशात आता खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन आ गये’ असे म्हणता येईल. लोकसभेबरोबर विधानसभेतही महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहील, अशी आशा आहे.

गरिबांचे कल्याण करावे
नरसय्या आडम (माकप केंद्रीय समिती सदस्य) - देशाच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसेतर पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी देशवासीयांना मोठी स्वप्ने दाखवली. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी निपटून काढण्याचे सूतोवाच केले. त्याला जागून काम करताना देशातील 35 कोटी असंघटित कामगारांचे कल्याण त्यांनी करावे. देशातील शंभर शहरांच्या विकासाचा मुद्दा त्यांनी पुढे केला आहे. ही चांगलीच बाब आहे.

परराष्ट्र धोरण मजबूत होईल
दिलीप धोत्रे (जिल्हा संघटन, मनसे) - मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास गुजरातसारखा होईल यात तीळमात्र शंका नाही. र्शीलंका व पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रित करून परराष्ट्र संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. मोदी यांनी देशासह महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावावा.