आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Enthusiasm And Congress Sadness Issue At Solapur, Divya Marathi

भाजपमध्‍ये उत्‍साह तर कॉंग्रेस आघाडीमध्‍ये चिंतेचे वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट- अक्कलकोट विधानसभा मतदार संघात तब्बल 122 गावांनी भारतीय जनता पक्षाचे शरद बनसोडे यांना मताधिक्य मिळवून दिले. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना फक्त 35 गावांमध्येच आघाडी घेता आली. या बदललेल्या परिस्थितीमुळे गेल्या लोकसभेत काँग्रेसला मिळालेल्या 912 मतांच्या आघाडीचे रूपांतर 25808 मतांच्या पिछाडीत झाले. हा फरक विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासाठी धडकी भरवणारा आहे. या निकालामुळे भाजपमध्ये उत्साह तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही भाजपने मारलेली मुसंडी उल्लेखनीय आहे. अक्कलकोट शहरात काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागातही भाजपने मताधिक्य घेतले आहे. या मतदार संघाचे नेतृत्व भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील करतात. सिद्रामप्पा पाटील यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा गत विधानसभा निवडणुकीत 1200 मतांनी पराभव केला होता. तरीही म्हेत्रे यांनी तालुक्यातील जनसंपर्क कमी केला नाही. कोणतेही पद नसतानाही त्यांनी सातत्याने लोकांची कामे केली. तालुक्यामध्ये खासगी तत्त्वावरील साखर कारखाना उभा करून शेतकर्‍यांना दिलासा दिला. तरीसुद्धा 25808 मतांची मिळालेली पिछाडी त्यांना विचार करायला लावणारी आहे.

यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मनापासून प्रचार केला होता. तरीही भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गडावर जोरदार हल्लाबोल चढविल्याचे स्पष्ट झाले. अक्कलकोट शहरात भाजपला अनुकूल वातावरण आहे. म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने आधीपासूनच शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर माळशेट्टी, विरोधी पक्षनेते अश्पाक बळोरगी, माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, मल्लिकार्जुन पाटील तसेच त्यांच्या दहा नगरसेवकांनी प्रयत्न करूनही भाजपला 3150 मतांची आघाडी मिळाली. याबाबत नेमके काय व ठे चुकले याचे आत्मचिंतन करण्याची वेळ काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकार्‍यांवर आली आहे.

क कॉंग्रेसच्या सभापती विमल गव्हाणे यांच्या दोड्याळ गावातून शिंदे यांना 323 मतांची तर उपसभापती सोनाबाई आलुरे यांच्या घोळसगावात भाजपला 275 मतांची आघाडी मिळाली. फकीर फातिमाबी यांच्या पितापूर गावातून शिंदे यांना 205 मतांची लीड मिळाली. तिपव्वा गायकवाड यांच्या खैराट गावातून फक्त 64 मतांची आघाडी शिंदे यांना मिळाली. सतीश प्रचंडे व महिबूब मुल्ला यांच्या नागणसूर गावातून बनसोडे यांना 1056 मताधिक्य मिळाले. महेश जानकर यांच्या सातनदुधनी गावातून भाजपला 37 मतांची तर संगीता लकाबशेट्टी यांच्या बबलाद गावातून काँग्रेसला फक्त 46 मतांची आघाडी मिळाली. या मतदार संघातील दक्षिण सोलापूरच्या 35 गावांचा समावेश आहे.

अभिजित ढोबळे यांच्या चप्पळगाव गणात काँग्रेसने 253 मतांची आघाडी घेतली. सिंधुताई सोनकवडे यांच्या वागदरी गावात भाजपने 993 मतांची आघाडी मिळवली. माजी आमदार महादेव पाटील, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या जेऊर गावामध्ये बनसोडे यांना 904 मतांची आघाडी मिळाली.

मोदी लाटेमुळे मिळालेल्या मताधिक्यामुळे भाजप महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळेच विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. आगामी लढत विद्यमान आमदार सिद्रामप्पा पाटील विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातच होण्याची दाट शक्यता आहे.