आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्ठावंत कार्यकर्ते सुटताहेत, नवे जोडणे झाले आहे कठीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतीय जनता पक्षात एकीकडे जुने कार्यकर्ते पक्षापासून अलिप्त होत आहेत, तर दुसरीकडे नवे कार्यकर्ते पक्षासोबत येताना दिसत नाहीत. शहरपातळीवर पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. अशा स्थितीत पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक सोलापुरात सोमवारी होत आहे. या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजिला आहे.

सोलापुरात भाजपचे सर्व सुरळीत सुरू आहे, असे चित्र नाही. विधानसभा मतदारसंघ शहर उत्तरमधून पक्षाचे आमदार विजयकुमार देखमुख सलग दुसर्‍यांदा निवडून आले. मात्र, त्यामागे पक्षापेक्षा वैयक्तिक संपर्क आणि समाजाचे पाठबळ हे मोठे कारण आहे. गेल्या चार वर्षांपासून शहराध्यक्षपदाची धुरा श्री. देशमुख यांच्याकडे आहे. भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात विधानसभा मतदारसंघ माळशिरस, अक्कलकोट व शहर उत्तर या तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. त्यापैकी अक्कलकोट आणि शहर उत्तरमधून पक्षाचे आमदार आहेत. भविष्यात यात फेरबदलाची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. अक्कलकोटची जागा धोक्यात आहे, तर शहर उत्तरमध्ये मोठी कसरत यंदा करावी लागणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुभाष देशमुख यांचा गट पक्षापेक्षा लोकमंगलचाच जास्त वाटतो. तरीही जिल्ह्यात त्यांना वगळता सक्षम नेता पक्षाकडे नाही.

लोकसभेसाठी अचडण
सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पक्षाच्या वतीने मागील निवडणुकीत शरद बनसोडे यांनी विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान दिले होते. लोकसभेसाठी गृहीतच धरलेल्या श्री. बनसोडे यांनी यंदा ‘ना’ म्हटल्याने पक्षाची अडचण झालेली आहे. पक्षाकडे लोकसभेसाठी पैशासह सक्षम असा दुसरा कोणी दिसत नाही.

प्रदेशाचे सोलापूरकडे दुर्लक्ष
प्रदेशाकडून दुर्लक्ष केले जात आहे. संघटन शक्ती बळकट करण्यासाठी मागील वर्षात शहरात एकही बैठक झाली नाही. जिल्ह्यात नितीन गडकरी, माधव भंडारींसह बोटांवर मोजण्याइतके नेते आले. शहरात नाराज गट असताना संघटनमंत्री अविनाश कोळी निष्क्रिय राहिले.

दक्षिण, मोहोळची जागा मागणार
विधानसभेसाठी शहर दक्षिण आणि मोहोळची सेनेची जागा भाजपसाठी मागणार आहे. शिवसेना सात, तर भाजप तीन विधानसभा जागा लढते. आम्ही पाच जागेची मागणी करणार आहोत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली.