आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये धुसफूस, निमित्त शरद बनसोडे यांचे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार शरद बनसोडे गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाच्या शहरातील आंदोलन व कार्यक्रमांना दांड्या मारत आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी बनसोडे यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने बनसोडेंच्या भविष्यातील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्षपदाची निवडणुका सुरळीत पार पडली असली तरी शहराध्यक्षांच्या निवडीत मात्र राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपत कलगीतुरा रंगत असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीनंतर ग्रामीणमध्ये भाजपत उत्साह, मात्र शहरात मरगळच असल्याचे जाणवू लागल्याने शहराध्यक्षांनी पदाधिकार्‍यांवर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्षानंतर शहराध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला असताना नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याने ही निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपकडून इच्छुक असलेले शरद बनसोडे यांनी सहा महिन्यांपासून शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला नाही, शहराध्यक्षांनाही ते भेटले नाहीत. त्यामुळे बनसोडे यांच्या विरोधात पक्षर्शेष्ठींकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहरातील पाणी प्रश्नावर भाजपकडून मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी बनसोडे गैरहजर होते. गृहमंत्री शिंदे यांच्या घरावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगीही बनसोडे उपस्थित नव्हते. पक्षाच्या कार्यक्रमात तसेच शहर विकासाच्या भूमिकेबाबत त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्याबद्दल पक्षात नाराजी वाढली आहे.

शहराध्यक्ष निवडीवेळी वाद
शहर भाजपमधील आताचे वातावरण पाहता शहराध्यक्ष निवडीप्रसंगी वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आमदार विजयकुमार देशमुख गट आणि त्यांच्या विरोधातील नाराज गट आमने- सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपमध्ये किशोर देशपांडे आणि लिंगराज वल्याळ यांना मानणारा वर्ग आमदार देशमुख यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे.

‘गॅप’ पडला, पण दुर्लक्ष नाही
दोन महिन्यांपूर्वी उजनीच्या पाण्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चात मी सहभागी होतो. त्यानंतर न्यायालयीन कामात व्यस्त असल्यामुळे अलीकडील काळात पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होता आले नाही. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात माझ्याकडून थोडास ‘गॅप’ पडला, पण दुर्लक्ष झालेले नाही.
-शरद बनसोडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, भाजप

बनसोडे भेटलेच नाहीत
शरद बनसोडे गेल्या सहा महिन्यांपासून मला भेटले नाहीत. त्यांनी पक्षासंदर्भात पदाधिकार्‍यांशी चर्चा केली नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने ते सक्रिय होणे आवश्यक आहे.
- आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष