आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा जल्लोष, ‘आप’ आनंदात; काँग्रेस पक्षाच्या गडावर दिवसभर सामसूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशातील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळाल्याने शहरातील भाजप नेते व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आम आदमी पक्षाने दिल्लीत पहिल्याच वेळी उल्लेखनीय कामगिरी केल्याने कार्यकर्त्यांनी सरस्वती चौकात जल्लोष केला, तर दुसरीकडे जिल्हा काँग्रेस भवनात मात्र पराभवामुळे अवकळा जाणवली. सारे काही शांत शांत दिसले.
आमदार विजयकुमार देशमुख, सेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, भारतीय विद्यार्थी सेनेचे महेश धाराशिवकर, नगरसेवक अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, जगदीश पाटील, राजू काकडे, प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते. सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयातही पेढे वाटण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक नरेंद्र काळे, अविनाश महागावकर उपस्थित होते.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली येथील विधानसभांचा निकाल जाहीर झाला. शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यासह काँग्रेसचे काही कार्यकर्ते काँग्रेस भवनात बसून दूरचित्रवाणीवर प्रसिद्ध होणारे निकाल पाहात होते. नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या काँग्रेस भवनात रविवारी मात्र शुकशुकाट जाणवला.
काँग्रेसचा व्होटबेस भाजपने बर्‍याच ठिकाणी ढिला केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदींनी शिवराजसिंह यांनी केलेल्या हॅट्ट्रिकबद्दल अभिनंदन केले ही आनंदाची गोष्ट आहे. देशात सुख, शांती आणि समृद्धी केवळ भारतीय जनता पार्टीच आणू शकते. अटलबिहारी वाजपेयी यांनी तो इतिहास घडवून आणला होता. पुन्हा आता ती संधी येऊ पाहाते आहे. ‘मोदी फॅक्टर’ आणि ही लाट जबरदस्त आहे. घराणेशाही मोडून काढण्यात भाजप यशस्वी झाले आहे.
- आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष, भाजप

>काँग्रेस करणार आत्मचिंतन, तर भाजप, ‘आप’ने वाटली मिठाई
>विजयोत्सव साजरा करताना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते.
>भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
लोकसभेला काँग्रेसच
आम्हाला पराभव मान्य आहे. आम्ही चिंतन करू. कमी पडलो त्याचा गांभीर्याने विचार केला जाणार आहे. लोकसभेत काँग्रेस पक्षाचाच विजय होणार आहे. नरेंद्र मोदी यांची जादू चालली नाही, असे आम्हाला वाटते.
-धर्मा भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष

मोदींचा करिष्मा नाही
चारही राज्यांतून काँग्रेस पक्षाला हार पत्कारावी लागली असली तरी या पाठीमागे नरेंद्र मोदींचा कुठलाच करिष्मा चालला नाही. तेथील स्थानिक प्रश्नांमुळे पराभव झाला. आम्ही आत्मचिंतन करू.
- बाळासाहेब शेळके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

लोकांसाठी काम करणार
आम आदमी पार्टीने राजकारणालाच कलाटणी दिली आहे. पैशाच्या प्राभावाला किती स्थान आहे, हे सत्ताधार्‍यांना पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पार्टी केवळ लोकांसाठी काम करणार आहे. सत्तेसाठी नव्हे.
- चंदूभाई देढीया, जिल्हा संयोजक

पहिल्या पावलात दिल्ली
आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी पहिल्या पावलात दिल्ली जिंकली आहे. सध्या भ्रष्टाचाराने राजकारण बरबटले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करणार आहे. मतं विकत घेऊन निवडणुकी जिंकता येत नाहीत, हे जनतेने दाखवून दिले आहे. सर्व उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे व सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे लोकांनी हा कौल दिला आहे.
- आर. एच. रिसबूड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य

भ्रष्टाचाराला वैतागली
सध्या देशात भ्रष्टाचारामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनाही परिवर्तन हवयं. हे परिवर्तन पार्टी नक्की घडवून आणू शकेल, हा विश्वास आहे. म्हणूनच हे यश मिळाले आहे. केजरीवाल यांनी शीला दीक्षितांना हरवून 22 हजार मतांच्या लीडने निवडून आले आहेत. यावरून लक्षात येते की, जनता काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली होती. चार राज्यांतील निकाल हेच सांगतो.
- निखिल ठाणेदार, शहर संयोजक