आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Rebellious In Solapur Latest News In Divya Marathi

बनसोडेंना विरोध, देशमुखही नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कोण यावरून शहर भाजपमध्ये चांगलेच रणकंदन माजल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी लढलेले अँड. शरद बनसोडे यांनी तयारी दर्शविल्यानंतर त्यांना आता स्थानिक कार्यकर्त्यांमधून विरोध होऊ लागला आहे. स्थानिक उमेदवार द्या, असे साकडे येथील कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना घातले आहे. तर दुसरीकडे माढय़ातील संधी गेली, उस्मानाबादलाही मिळत नसल्याने माजी खासदार सुभाष देशमुखही नाराज आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून काँग्रेसने सोलापुरात लोकसभा निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. त्या तुलनेत भाजप अगदीच शांत आहे. लढणार नाही असे म्हणणारे अँड. बनसोडे यांनी घूमजाव करीत पुन्हा लढण्याची तयारी दाखविली आहे. मात्र भाजपकडे उमेदवार नाही म्हणून मला लोकसभेचे तिकीट मिळेल, असे अँड. बनसोडे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, स्थानिकांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपमधील एका शिष्टमंडळाने भाजपचे नेते खा. गोपीनाथ मुंडे यांची शनिवारी सकाळी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केली.
स्थानिकांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपत एक गट सक्रिय झाला आहे. शहर भाजपचे अध्यक्ष, आमदार विजयकुमार देशमुख हेच सोलापूर लोकसभेचे प्रभारी आहेत. त्यांनाही तसे निवेदन दिले. या शिष्टमंडळात अशोक कटके, दीपक सोनकवडे, डॉ. सुरेश कोरे, रमेश व्हटकर, संजय क्षीरसागर, सतीश पाटील (मोहोळ), बाळासाहेब आसुडे, सूर्यकांत व्हटकर आदींचा समावेश होता.
रोहन उस्मानाबादेतून अपक्ष?
एकदा विधान परिषद आणि एकदा लोकसभेत काँग्रेसचा पराभव करत निवडून आलेले सुभाष देशमुख हे माढा मतदार संघ न मिळाल्याने नाराज झाले आहेत. उस्मानाबादला चिरंजीव रोहन यांचे नाव पुढे केले गेले आहे. पण तेथेही संधी मिळण्याची शक्यता धूसर दिसते आहे. त्यामुळे रोहन देशमुख अपक्ष म्हणून निवडून लढविण्याची दाट शक्यता आहे. यंत्रणा असूनही संधी मिळत नसल्याने देशमुख नाराज असल्याची चर्चा आहे.