आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप-सेना, माकपचा गुडेवारांसाठी आज बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे गुरुवारी सोलापूर बंदचे आयोजन केले आहे. चेंबर आॅफ कॉमर्सच्या बैठकीत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, तर हा बंद हाणून पाडण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.

गुडेवार यांची बदली काँग्रेसने राजकीय हेतूने केली असल्याची टीका करत भाजप, सेना व माकपने रस्त्यावर उतरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंत्रमाग कामगारांसह बंदमध्ये सहभागी होत आहे. गुरुवारी कॉ. मधुकर पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक बैठक झाली, त्यात कामगारांनीही गुडेवार यांच्या समर्थनार्थ बंदमध्ये सहभागी होण्याला संमती दिली. ही बदली रद्द करावी अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. त्यासाठीच हे आंदोनल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भारतीय जनता पक्ष, शिवसेनेनेही या बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. दोन ठिकाणाहून मोर्चाचे नियोजन केले आहे.
चेंबरचे दुकाने उघडण्याचे आवाहन
चेंबर आॅफ कॉमर्सने बैठक घेऊन बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला. व्यापार्‍यांनी आपले व्यवहार चालू ठेवावेत, दुकाने उघडावीत असे आवाहन करण्यात आले आहे. चेंबरचे सचिव धवल शहा यांनी सांगितले की, गुडेवारांची बदली हा प्रशासकीय विषय आहे. बदलीच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाबाबत आम्ही तटस्थ आहोत. हा राजकीय आंदोलनाचा भाग आहे. आमचा एलबीटीचा लढा चालूच आहे. या राजकीय आंदोलनात सहभागी होणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे.
काँग्रेसही बंदच्या विरोधात
राजकीय हेतूने बंदचे आंदोलन करण्यत येत आहे. गुडेवार यांची बदली प्रशासकीय भाग आहे. त्यांनी बदली मागितलीच होती. त्यामुळे त्यांची बदली झाली आहे. गुरुवारी होणारे बंदचे आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाणून पाडावे, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी केले आहे.

दोन ठिकाणांहून मोर्चे
सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत बंद राहील. मेकॅनिक चौकातून आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर पूर्व भागातून दत्त नगर येथून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम व कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघणार आहेत.
पोलिस संरक्षणाची मागणी
बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही याबाबत संबंधित असोसिएशनने निर्णय घ्यावेत, असे चेंबरच्या बैठकीत ठरले. दुकाने सुरू राहणार असतील तर त्यांना पोलिस सरंक्षण द्यावे अशी मागणी चेंबर पोलिसांकडे केली आणि तसे पत्र दिल्याची माहिती प्र्रभाकर वनकुद्रे यांनी दिली.