आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण: 'अच्छे दिन'चे श्राद्ध अन् काँग्रेसला श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशात आता चांगले दिवस येणार अशा घोषणा देऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, पण गेल्या वर्षात केले काहीच नाही, असा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी "अच्छे दिन'चे प्रतिकात्मक श्राद्ध घालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या काँग्रेसला जनतेने वर्षापूर्वीच मूठमाती दिली, असे सांगत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रतिकात्मक श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला.
मोदी सरकारच्या कामकाजाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवारी शहरातील राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. त्यातून सोलापूरकारांची करमणूकही झाली.
दृष्टिकोन
राजकीय पक्षांच्या भूमिका ठरलेल्या असतात. स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्याचे आव्हान पक्षांसमोर असते. अशा खटाटोपातून योग्य मूल्यमापनाऐवजी केवळ आंधळा विरोध अथवा समर्थन सुरू होते. यातून श्राद्ध आणि श्रद्धांजलीसारखे उथळ प्रकार घडू लागतात. परंतु यामुळे लोकहिताचे, विकासाचे मुद्दे मागे पडू शकतात. लोकांच्या विषयावर लोकसंग्रह करणे, प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणे कधीही श्रेयस्कर ठरते. अनेकदा सवंग प्रसिद्धी मिळते, लोकांच्या हाती काहीच मिळत नाही.
सराफ कट्ट्याजवळ श्रद्धांजली
सायंकाळी सराफ कट्ट्याजवळ सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला श्रद्धांजली वाहिली. एक वर्षाच्या मोदी राजवटीत कसलेही घोटाळे नाहीत. जन-धन, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, पंतप्रधानाचे यशस्वी परदेश दौरे, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वस्त विमा-स्वस्त पेन्शन योजना ही कामगिरी मोदी सरकारने केली. तरीही कॉँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पराभवाला एक वर्ष झाल्यानिमित्त श्रद्धांजली वाहिल्याचे महेश धाराशिवकर म्हणाले. मल्लू याळगी, नागराज कंदकूर, धनंजय तपासे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्राद्ध
प्रदेश काँग्रेसने मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशी श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक श्राद्ध घातल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगतिले. विकासाऐवजी जातीय हिंसाचार आणि महागाई वाढल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी महापौर सुशीला आबुटे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. ज्योती वाघमारे, संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...